उच्च न्यायालयाचा दिलासा ! संजय सिंह यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती

लखनौ : आपचे नेते संजय सिंह यांना गुरूवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सिंह यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली. राज्यसभेचे विद्यमान खासदार असणाऱ्या सिंह यांनी सपचे नेते अनुप संडा आणि इतर काही जणांसमवेत २३ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या सुलतानपूरमध्ये निदर्शने केली.
विस्कळीत वीज पुरवठ्याच्या निषेधासाठी ते पाऊल उचलण्यात आले. त्यावेळी त्यांच्या विरोधात रस्ता रोखल्याच्या आणि हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणी सुलतानपूर न्यायालयाने मागील वर्षीच्या प्रारंभी सिंह यांच्यासह ६ जणांना दोषी ठरवले. त्यांना ३ महिने तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
त्या शिक्षेला दिलेले आव्हान काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर सुलतानपूर न्यायालयाने सिंह यांना हजर राहण्यास सांगितले. मात्र, हजर न राहिल्याने त्यांच्या अटकेचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर सिंह यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांनी शिक्षेलाही आव्हान दिले. त्यावरून उच्च न्यायालयाने सिंह यांना तूर्त दिलासा दिला.





