एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा: ४४% थकीत पगार मंगळवारपर्यंत मिळणार, शिंदेंचा पुढाकार

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल महिन्याचे फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. सांगोला दौऱ्यावर असताना काही कर्मचाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेऊन उर्वरित वेतनाची मागणी केली. त्यांनी तात्काळ वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला. गुप्ता यांनी मंगळवारपर्यंत वेतन अदा करण्याचे आश्वासन दिले आहे.
कर्मचाऱ्यांचे गाऱ्हाणे –
एसटी कर्मचारी अनेक समस्यांना तोंड देत आहेत. २०१८ पासूनचा महागाई भत्ता अद्याप मिळालेला नाही, ज्याची थकबाकी ५६ टक्क्यांवर पोहोचली आहे. हायकोर्टाच्या एकरकमी भत्ता देण्याच्या आदेशालाही हरताळ फासला गेला. मार्च महिन्यात प्रथमच ५६ टक्केच पगार मिळाला. पगार वेळेवर होत नाही, कधी ८, कधी १० तारखेला मिळतो. एसटी रोज २२ कोटी, म्हणजे महिन्याला ६६०-७०० कोटी रुपये कमावते, तरीही ४४० कोटींच्या पगारासाठी खोळंबा का, असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी ३६ प्रकारच्या सवलती असूनही सरकार भरपाई करत नाही. घरभाडे भत्ता ८ टक्के असूनही ७ टक्केच मिळतात, तेही वेळेवर नाही.
दरम्यान, शिंदे यांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, वेतन कपातीचे संकट टळले आहे.





