Devendra Fadnavis : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
आजपासून शासनाकडून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी साताऱ्यात केली.

Devendra Fadnavis : राज्यात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आजपासून शासनाकडून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी साताऱ्यात केली.
तसेच, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार करत पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
साताऱ्यातील सैनिक स्कूल मैदानावर राज्यातील पाच लाख घरकुलांचे लोकार्पण आणि १० हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. (Devendra Fadnavis)
या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराज सिंह चौहान, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
राज्यात सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदीचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारला माहीत आहेत. कांद्याच्या दरातील घसरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे ते म्हणाले. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जयंत पाटलांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी
नुकतेच शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली होती. कांद्याला किमान 2000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात यावा तसेच सध्याच्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
साखर उद्योगातील अडचणी सोडवण्यासाठी लवकरच दिल्लीत बैठक
दरम्यान, राज्यातील साखर उद्योगासमोरील अडचणींवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. ऊस उद्योगातील प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच दिल्लीत बैठक घेण्यात येणार असून केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.






