Ghod Dam News : शेतकऱ्यांना दिलासा.! घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा
धरणाच्या खालच्या बाजुस शिरसगांव काटा , धनगरवाडी , इनामगांव , नलगेमळा , गांधले मळा , तांदळी खोरे , तांदळी संगम येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असुन घोड धरणाच्या पाण्यामुळे या बंधाऱ्याना मोठया प्रमाणात फायदा होतो.

Ghod Dam News – शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली.
चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त पाणीसाठा ५४६७ दशलक्ष घनफुट आणि मृत पाणीसाठा २१७२ दशलक्ष घनफुट आहे. धरणाला दोन कालवे असुन उजव्या कालव्याची लांबी ३० किमी आणि डाव्या कालव्याची लांबी ८४ किमी आहे.
घोड धरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, तसेच शिरुर, काष्टी व श्रीगोंदा येथील अनेक गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी नेलेले आहे.
शिरुर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यातील मिळून सुमारे २० हजार ५०० हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली आले असुन शेतीसाठी या धरणाच्या पाण्याचा वापर केला जातो.
धरणाच्या खालच्या बाजुस शिरसगांव काटा , धनगरवाडी , इनामगांव , नलगेमळा , गांधले मळा , तांदळी खोरे , तांदळी संगम येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असुन घोड धरणाच्या पाण्यामुळे या बंधाऱ्याना मोठया प्रमाणात फायदा होतो. सध्या घोड धरण 82 टक्के भरल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.





