रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक तेजीत; 3 दिवसानंतर शेअर निर्देशांकात वाढ

मुंबई : गेल्या तीन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक घसरत होते. त्यामुळे मंगळवारी बर्याच गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांक अर्धा टक्क्यापर्यंत वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 446 अंकांनी वाढून 81,337 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 140 अंकांनी म्हणजे 0.57 टक्क्यांनी वाढून 24,821 अंकावर बंद झाला.
रिलायन्स आणि एचडीएफसी बँकेशिवाय लार्सन अँड ट्यूबरो, एअरटेल, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, मारुती, बजाज फायनान्स या कंपन्याही तेजीत होत्या. मात्र अॅक्सिस बँक, टीसीएस, टायटन, आयटीसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. लेमन मार्केट डेस्क या कंपनीचे विश्लेषक गौरव गर्ग यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणूकदार खरेदी करत नाहीत. सोमवारी या गुंतवणूकदारांनी 6,082 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
देशातील व परदेशातील अनेक घटनाक्रमाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराकडून सावध पवित्रा कायम राहण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात तेजीचे वातावरण आहे. मात्र भारत -अमेरिका करार अधांतरी असल्यामुळे शेअर बाजारावर अनिश्चिततेची छाया पसरली आहे. मुंबई शेअर बाजारातील 2,486 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली तर 1,515 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. एक ऑगस्टला अमेरिकेचे पत धोरण जाहीर होणार आहे. त्याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय विविध कंपन्यांच्या ताळेबंदानुसार संबंधित कंपन्यांच्या शेअरच्या भावात चढ -उतार होत आहेत.





