nagar | कत्तलीसाठी जाणार्या गोवंशीय जनावरांची सुटका

नगर, (प्रतिनिधी) – टेम्पोतून कत्तलीसाठी घेऊन जाणार्या पाच गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. टेम्पो, जनावरे असा ८८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. रविवारी (दि.७) सकाळी सहाच्या सुमारास केडगाव शिवारात सोनेवाडी रस्त्यावर अंबिका हॉटेलजवळ पोलिसांनी ही कारवाई केली
या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. सन्नान इब्राहीम शेख (वय ५० रा. जुने तालुका पोलीस ठाण्याजवळ, हमालवाडा, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
टेम्पोमध्ये दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरून ते कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक नियुक्त करून कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने रविवारी सकाळी सहाच्या सुमारास केडगाव शिवारात सोनेवाडी रस्त्यावर सापळा लावला.
संशयित टेम्पो येताच पथकाने तो पकडला. पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात तीन गाई व दोन वासरे अशी पाच जनावरे मिळून आली. टेम्पो चालक शेख याच्याकडे चौकशी केली असता सदरची जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष लगड करत आहेत.





