Rekha gupta : रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; प्रवेश शर्मा उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली : भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. रेखा गुप्ता यांनी भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी रेखा गुप्ता याच उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असंही जाहीर केले आहे. तर, परवेश शर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार आहेत. भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या आणि दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी आजच दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसादर आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली, त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे, त्या उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
रेखा गुप्ता ह्या आरएसएसच्या सक्रीय सभासद आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील. काँग्रेसच्या शीला दीक्षित, भाजपच्या सुषमा स्वराज्य, आपच्या आतिषी यांनी याआधी मुख्यमंत्रिपद भूषवले होते.
कोण आहेत रेखा गुप्ता?
रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. तर सध्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांनी आप नेता बंदना कुमारी यांना २९,५९५ मतांनी धूळ चारली. रेखा गुप्ता यांना ६८,२०० मते मिळाली. तर बंदना कुमारी यांना ३८,६०५ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रवीण जैन यांना ४,८९२ मते मिळाली.
रेखा गुप्ता भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्या हरियाणाच्या जींद येथे राहणाऱ्या आहेत. त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या सचिव आणि अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यांनी २००७ आणि २०१२ साली उत्तरी पीतमपुरा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला.





