CM Rekha Gupta Attack: हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा यांची पहिली प्रतिक्रिया…., नेमकं काय घडलं? हल्लेखोर कोण? जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली – दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी सिव्हिल लाइन्स येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आयोजित साप्ताहिक सार्वजनिक सुनावणी दरम्यान एका व्यक्तीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दिल्ली पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केली असून, त्याच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्याची घटना कशी घडली?
सकाळी सिव्हिल लाइन्स येथील मुख्यमंत्री निवासस्थानात रेखा गुप्ता यांच्या साप्ताहिक सार्वजनिक सुनावणीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात सामान्य नागरिक आपल्या तक्रारी आणि समस्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. यावेळी सुमारे 40 वर्षीय एक व्यक्ती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे काही कागदपत्रे देण्यासाठी आला. कागदपत्रे देताच त्याने अचानक जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. हल्लेखोराने रेखा गुप्ता यांचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी शारीरिक झटापट करण्याचा प्रयास केला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोराने रेखा गुप्ता यांना थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, तर काहींच्या मते त्याने दगड फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी थप्पड किंवा दगडफेकीच्या दाव्यांचे खंडन केले आहे. सचदेवा यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने मुख्यमंत्र्यांचा हात पकडून खेचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे धक्काबुक्की झाली आणि यात रेखा गुप्ता यांचे डोके टेबलाच्या कोपऱ्यावर आदळले. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे, परंतु त्या सदम्याच्या स्थितीत असल्याचेही नमूद केले आहे.
हल्लेखोर कोण?
दिल्ली पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केली असून, त्याने आपले नाव राजेश खिमजी असून तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्याच्या नावाची आणि पत्त्याची पडताळणी सुरू केली असून, त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, हल्ल्यामागील हेतू आणि संभाव्य कट याचा तपास सुरू आहे.
आज सुबह जनसुनवाई के दौरान मेरे ऊपर हुआ हमला केवल मेरे ऊपर नहीं, बल्कि दिल्ली की सेवा और जनता की भलाई के हमारे संकल्प पर किया गया एक कायराना प्रयास है।
स्वाभाविक है कि इस हमले के बाद मैं सदमे में थी, परन्तु अब बेहतर महसूस कर रही हूँ। मैं अपने सभी शुभचिंतकों से निवेदन करती हूँ कि…
— Rekha Gupta (@gupta_rekha) August 20, 2025
मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया –
हल्ल्यानंतर रेखा गुप्ता यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पहिली प्रतिक्रिया दिली, त्यांनी लिहिले, “आज सकाळी सार्वजनिक सुनावणीदरम्यान माझ्यावर झालेला हल्ला केवळ माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेची सेवा आणि त्यांच्या भल्यासाठी आमच्या संकल्पावर केलेला एक कायरतापूर्ण प्रयास आहे. या हल्ल्यानंतर मी काही काळ सदम्यात होते, परंतु आता बरे वाटत आहे. माझ्या शुभचिंतकांना विनंती आहे की, कृपया मला भेटण्यासाठी त्रास करू नये. मी लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होईन. असे हल्ले माझा हिरमोड करू शकत नाहीत. उलट, मी आता अधिक ऊर्जा आणि समर्पणाने तुमच्या सेवेत असेन. सार्वजनिक सुनावणी आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण यापुढेही गंभीरपणे आणि बांधिलकीने सुरू राहील. तुमचा विश्वास आणि समर्थन हेच माझी सर्वात मोठी ताकद आहे.”
राजकीय प्रतिक्रिया –
या हल्ल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, हल्लेखोराने रेखा गुप्ता यांचा हात पकडून खेचण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे धक्काबुक्की झाली. त्यांनी थप्पड किंवा दगडफेकीच्या दाव्यांचे खंडन केले आणि हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले.




