रेड्डी, माधव भाजपचे निवडणूक प्रभारी; जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीची सोपवली जबाबदारी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. त्या पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव आणि केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांची नियुक्ती केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जम्मू-काश्मीरसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह यांनी निवेदनाद्वारे दिली.
त्यामुळे भाजपने प्रामुख्याने माधव यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवल्याचे स्पष्ट झाले. ते २०१४ ते २०२० या कालावधीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमधील पक्षाच्या राजकीय कामकाजाची जबाबदारी सांभाळली. भाजपने २६ सप्टेंबर २०२० यादिवशी नवी टीम नेमत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले.
त्यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी माधव आणि इतर काही सरचिटणीसांना वगळण्यात आले. आता माधव यांच्या अनुभवाचा वापर भाजप जम्मू-काश्मीरमधील राजकीय रणसंग्रामासाठी करणार असल्याचे दिसते. तेथील निवडणुकीचा कार्यक्रम याआधीच जाहीर झाला आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत.





