Baby Do Die Do: लाल छत्री, रहस्यमय हत्या आणि हुमा कुरेशी; ‘बेबी डू डाय डू’चा व्हिडिओ प्रदर्शित
Baby Do Die Do चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘बेबी डू डाय डू’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Baby Do Die Do: अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या आगामी ‘बेबी डू डाय डू’ या अॅक्शन आणि थरारपटाचा परिचय व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमधून चित्रपटातील मुख्य पात्र ‘बेबी कर मर कर’ची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. हुमा कुरेशी या भूमिकेत अतिशय धाडसी, रहस्यमय आणि धोकादायक अंदाजात दिसत असून तिच्या या नव्या रूपाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.
प्रदर्शित करण्यात आलेल्या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये मुंबई शहरात घडणाऱ्या अनेक गूढ हत्यांची कथा दाखवण्यात आली आहे. या हत्यांमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असते. या घटनांमागे नेमके कोण आहे, याचा शोध पोलीस आणि प्रसारमाध्यमे घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
या सगळ्या गोंधळात लाल रंगाची छत्री हातात घेऊन फिरणारी एक रहस्यमय महिला लोकांचे लक्ष वेधून घेते. व्हिडिओमध्ये एका महिलेचा आवाज ऐकू येतो. ती म्हणते, “माझी बहीणच खून करणारी आहे, पण मी तुम्हाला हे सांगितले आहे, हे तिला सांगू नका.” या संवादामुळे कथेमधील रहस्य अधिकच गडद होते.

Baby Do Die Do Introduction Video
व्हिडिओच्या शेवटी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा खुलासा करण्यात येतो. अनेक हत्यांमागील व्यक्ती दुसरी कोणी नसून हुमा कुरेशीच असल्याचे दाखवले जाते. ती ‘बेबी कर मर कर’ या नावाने ओळखली जाते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या पात्राचे वर्णन भारतातील पहिली ‘देसी हॉट वूमन’ असे केले आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी लवकरच चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘बेबी डू डाय डू’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात हुमा कुरेशीसोबत सिकंदर खेर, चंकी पांडे, सीमा पाहवा, विद्या मालवडे आणि हिमांशू मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. जसमीत के. रीन आणि परवेज शेख यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून गौरव शर्मा आणि दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी पटकथा तयार केली आहे.
‘BABY DO DIE DO’ THE REVEAL IS HERE – 3 JULY 2026 RELEASE… Presenting #HumaQureshi as Baby KarMarKar, India’s first desi hitwoman… A fascinating animated reveal finally introduces the woman everyone has been searching for.
#BabyDoDieDo – the mystery thriller arrives in… pic.twitter.com/fmM9wa3yvB
— taran adarsh (@taran_adarsh) June 5, 2026
हा चित्रपट सलीम सिब्लिंग्स या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. ही संस्था भाऊ-बहीण हुमा कुरेशी आणि साकिब सलीम यांनी सुरू केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.
हुमा कुरेशीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती अलीकडेच ‘दिल्ली क्राइम’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या पर्वात दिसली होती. तसेच ‘महाराणी’ या राजकीय पार्श्वभूमीवरील मालिकेतील तिच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. याशिवाय ती लवकरच ‘टॉक्सिक’ या कन्नड अॅक्शन-थरारपटातही झळकणार आहे. या चित्रपटात यश, नयनतारा आणि कियारा अडवाणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘बेबी डू डाय डू’च्या परिचय व्हिडिओमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून आता प्रेक्षकांना त्याच्या टीझर आणि ट्रेलरची प्रतीक्षा लागली आहे.





