हंगामाच्या सुरुवातीलाच लाल कांदा तेजीत

पुणे – जुन्या कांदाचा हंगाम आता अखेरीस आला आहे. नवीन लाल कांद्याची (हळवी) आवक सुरू झाली आहे. लाल कांद्याची प्रतवारी चांगली आहे. दक्षिणेकडील राज्यातून लाल कांद्याला मागणी वाढली आहे. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर हंगामाच्या पहिल्या टप्प्यात लाल कांद्याचे भाव तेजीत राहणार आहेत.
दिवाळीनंतर लाल कांद्याची आवक पुणे, नवी मुंबई तसेच नाशिक बाजार समिती आवारात सुरू झाली आहे. जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला होता. जुन्या कांदा भावात प्रतिकिलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली. कांदा भावात अचानक वाढ झाल्याने ग्राहकांना झळ सोसावी लागली. जुना कांद्याचा साठा संपत आल्याने चांगले भाव मिळाल्याने शेतकरी सुखावले. दिवाळीनंतर नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा भागातून नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे.
“लाल कांद्यानंतर उन्हाळी कांद्याची (गरवी) लागवड केली जाते. लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची प्रतवारी उत्तम मानली जाते. यंदा पावसाने ओढ दिल्याने उन्हाळी कांद्याच्या लागवडीवर परिणाम होणार आहे. पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. लाल कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर दक्षिणेकडील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यातून मागणी वाढली आहे. नवीन कांद्याला यंदा भाव मिळणार आहेत.” – रितेश पोमण, कांदा व्यापारी, मार्केट यार्ड





