satara | संपाच्या इशाऱ्यामुळे आरोग्य विभागात कंत्राटी चालकांच्या भरतीचा घाट
सातारा, (प्रतिनिधी) – सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात आरोग्य विभागाच्या कचरा संकलनाची गणित अजून जुळलेले नाही. किमान वेतन मिळत नसल्याने घंटागाडी चालकांनी मंगळवारपासून संपाचा इशारा दिला आहे. पालिकेने चालक व वाहकांची पर्यायी व्यवस्था उभारण्याचे धोरण ठेवले आहे. यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी जास्त चिघळला जाणार आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचा धरसोडपणा स्पष्ट झाला असून ठेकेदाराचे लांगुलचालन करण्यासाठी सर्व आरोग्य व्यवस्था त्याच्या कलाने जात असल्याची कामगारांची तक्रार आहे.
किमान वेतन कायद्याप्रमाणे साडे चौदा हजार रुपये वेतन घंटागाडी चालकांना दिले जावे अशी अपेक्षा आहे. मात्र किमान नियमित वेतनात कपात करून ते पैसे परस्पर ठेकेदाराकडे वळवले जातात, अशी अभद्र व्यवस्था पालिकेत असल्यामुळे कामगारांचे नुकसान होते, अशी तक्रार कामगार खासगीत करत आहेत.
त्यामुळेच घंटागाडी चालक आणि सहाय्यक यांनी बुधवार दि.18 रोजी पासून संपाचा इशारा दिला आहे. या प्रश्नावर पालिका व्यवस्थापनाने चर्चा न करता नवीन घंटागाडी चालक आणि सहाय्यक नेमण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केले आहेत, त्यामुळे कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. कामगार संघटने कडे हा प्रश्न गेला असला तरी आरोग्य विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे.
कचरा संकलन ठप्प होणार
बुधवारी संप झाला तर सातारा शहराचे कचरा संकलन ठप्प होणार आहे. याशिवाय घंटागाडी दुरुस्ती हा सुद्धा संवेदनशील विषय आहे. घंटागाड्यांची दुरुस्ती करून त्याचा अधिभार जुन्या ठेकेदाराच्या अनामत रकमेतून काढला जाणार आहे. मुळात घंटागाडी ठेकेदाराला दिल्यानंतर त्याच्याकडून नाममात्र भाडे घेणे अपेक्षित असताना ठेकेदाराची दिवाळी करण्याच्या दृष्टीने धोरण आखले जात आहे.
दुरुस्ती पालिकेने करायची आणि ठेकेदाराला काम न करता बिले सुद्धा द्यायची ही अभद्र पोषण व्यवस्था कशासाठी ? असा कामगारांचा प्रश्न आहे नवीन कामगार भरती तातडीने थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा घंटागाडी चालकांनी दिला आहे





