पोलीस दलात 7,231 पदांची भरती : अजित पवार

नाशिक – गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात त बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय कुमार उपस्थित होते.
पवार म्हणाले, पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली आहे. तसेच राज्यातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यातील 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरूवातही झाली आहे. महिला पोलीसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्य शासनामार्फत पोलिसांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस एक कुटुंब आहे या भावनेतून अनेक सकारात्मक उपक्रम सध्या राबविले जात आहेत. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे राहणीमान जीवनमान सुधारावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
पोलीस दलाच्या सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक त्या सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी त्यांनी दिली.
पोलीस दलासाठीचे महत्त्वाचे निर्णय :
– पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती
– शिपाई पदावरील कर्मचारी निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल.
– राज्यात 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरुवात
– महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटीचा निर्णय लागू
– राज्य पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय





