‘अधीर मन झाले…’ पुजाच्या अदांनी तोडले अनेक गाण्यांचे रेकॉर्ड

मुंबई – आपल्या कडे चित्रपटापेक्षाही त्यातला एखादा संवाद, गीत किंवा कलाकाराचा लूक प्रचंड गाजतो. असं काहीस प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘नीळकंठ मास्तर’ या चित्रपटा बद्दल घडून आलं आहे. चित्रपटाचं कौतुक झालं. १९४२ ते १९४७ या पाच वर्षांमधील स्वांतत्र्य चळवळ आणि त्यात असलेली निळकंठ मास्तरची प्रेमकथाया चित्रपटात दाखवण्यात आली होती.
चित्रपटात निळकंठ मास्तरच्या मध्यवर्ती भूमिकेत ओम्कार गोवर्धन आहे. तर विश्वनाथच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, विश्वनाथच्या बायकोच्या यशोदाच्या भूमिकेत नेहा महाजन, आणि इंदुच्या भुमिकेत पुजा सावंत आपल्याला दिसेल. सर्वच स्तरातून ‘नीळकंठ मास्तर’ चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्याहीपेक्षा या चित्रपटातलं ‘अधीर मन झाले…’ हे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालनं गायलेलं आणि अभिनेत्री पूजा सावंतवर चित्रित झालेलं गाणं प्रचंड गाजलं.
नुकतंच ‘अधीर मन झाले…’ या गाण्यानं यू-ट्यूबवर तब्ब्ल १०० मिलियन म्हणजेच १० कोटी व्ह्यूजचा टप्पा गाठला. एवढे व्ह्यूज मिळवणारं हे मराठीतलं एकमेव गाणं असावं, अशी चर्चा आहे. चाहत्यांकडून या गाण्याला एवढं प्रेम मिळतंय, त्याबद्दल अभिनेत्री पूजा सावंतनं आनंद व्यक्त केला. गजेंद्र यांनीच लिहिलेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे.





