2022मध्ये विक्रमी 6.75 लाख घरांची विक्री

नवी दिल्ली – सरलेल्या वर्षात देशातील सात मोठ्या शहरात झालेली घर विक्री वाढून 3.65 लाख युनिट इतकी झाली आहे. या अगोदर 2014 मध्ये विक्रमी घर विक्री झाली होती. त्यानंतर 2022 वर्षाने हा विक्रम मोडला आहे. व्याजदर वाढ होऊनही मागणी जबरदस्त असल्यामुळे घरांची विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऍनारॉक या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालातील माहितीनुसार या वर्षांत कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे घरांच्या दरात चार ते सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2021 मध्ये 2.36 लाख घरांची विक्री झाली होती. त्यात तुलनेत यावर्षी झालेली विक्री 54 टक्क्यांनी वाढून 3.64 लाख इतकी झाली आहे. या अहवालासाठी पुणे, हैदराबाद, बंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या शहरातील आकडेवारीचा विचार करण्यात आला आहे. 2014 मध्ये 3.43 लाख घरांची विक्री झाली होती.
मुंबइत एक लाख घरांची तर दिल्लीत 63 हजार घरांची विक्री झाली आहे. पुण्यातील घरांची विक्री 59 टक्क्यांनी वाढून 57, 146 युनिट एवढी झाली. गेल्या वर्षी पुण्यात 35,975 ची विक्री झाली होती. या शहरांमध्ये विक्रीविना पडून असलेल्या घरांची संख्या वेगाने कमी होत आहे. यावर्षी 3.57 लाख घरासाठीच्या नव्या योजना या सात शहरांमध्ये चालू झाल्या आहेत. 2022 मध्ये रिऍल्टी क्षेत्रासमोर अनेक प्रश्न होते. रशिया- युक्रेन प्रश्न युद्ध सुरू होते. जागतिक व्यापारावर परिणाम झाला होता. व्याजदरात वाढ होत होती. तरीही मागणी वाढल्यामुळे भारतात या वर्षात घरांची विक्री वाढण्यास मदत मिळाली आहे. त्याचबरोबर घरांच्या किमती वाढूनही त्याचा ग्राहकाच्या मानसिकतेवर फारसा परिणाम झालेला नाही.
आता न विकल्या गेलेल्या घरांची संख्या एक टक्क्याने कमी होऊन 6.30 लाख युनिट इतकी झाली आहे. ही इन्व्हेंटरी वेगाने कमी होत असून आगामी काळामध्ये ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र वाढलेले व्याजदर आणि वाढलेल्या घराच्या किमती याचा परिणाम आगामी काळात काही प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे या संबंधात सरकार अर्थसंकल्पात काय करते याकडे विकसकांचे लक्ष आहे.





