Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांत विक्रमी पावसाची नोंद; जनजीवन विस्कळीत

पुणे : जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर या तीन तालुक्यांत गेल्या २४ तासांत विक्रमी पाऊस पडला आहे. विशेषत: बारामती तालुक्यात मे महिन्यात गेल्या ५० वर्षांत पडला नाही एवढा पाऊस रविवारी (दि. २५) रोजी पडला. बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
इंदापूर तालुक्यातील तब्बल ७२, तर बारामती तालुक्यातील ७१ अशा एकूण १४३ घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते, तसेच २५ घरांची पडझड झाली आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण येथे मच्छिमाराचा वीज कोसळून, तर दौंड येथे ज्येष्ठ महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. काटेवाडी येथील एका घरात ओढ्याचे पाणी शिरल्याने ७ जण अडकले होते. या सर्वांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूप बाहेर काढले, तर बारामतीतील नारोळी येथे एक गाय मृत्युमुखी पडली आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या, तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत सर्व १४३ घरांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने स्वतंत्र चर काढून पाणी बाहेर काढण्यात आले. इंदापूर तालुक्यातील तावशी येथील जाधववस्तीतील एका घराला पाण्याने वेढा दिल्याने येथे एक व्यक्ती आणि जनावरे अडकली होती.
त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बारामती तालुक्यातील जळोची येथे ओढ्याचा अंदाज न आल्याने रिपेश सिंग (वय ३३) दुचाकी गाडीसह वाहून गेला. मात्र, पुढे पात्रात एका बाजूला अडकून राहिल्याने वाचला.
बारामती नगरपालिकेच्या आग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. इंदापूर तालुक्यातील जांब येथे नीरा नदीवरील बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आलेले दोन मजूर पोकलेनसह नदीत अडकले होते. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
२१ मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त नोंद
बारामती शहर परिसर (१९४.८ मिमी), सणसर (१९४.८ मिमी), लोणावळा (१७४ मिमी), कुसगाव (१७४ मिमी), कार्ला (१७१.५ मिमी), टाकवे बु. (१७१.५मिमी), खडकाळ (१७१.५मिमी), भिगवण (१३६.३ मिमी), न्हावरा (११४.३ मिमी), पारगाव (११४.३ मिमी), निमोणे (११४.३ मिमी), माळेगाव (१०८.३ मिमी), राजूर (७७ मिमी), आपटाळे (७७ मिमी), देऊळगाव (७३.५ मिमी), पणदरे (७०.३ मिमी), वडगाव रासाई (६७.३ मिमी), राहू (६५.८ मिमी), कुंभारवळण (६५ मिमी), माले (६५ मिमी) आणि नारायणगाव (६४.८ मिमी) अशा पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २१ मंडळामध्ये गेल्या २४ तासांत ६५ मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बारामती आणि सणसर येथे तर विक्रमी १९४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
खडकवासला डावा कालवा फुटला
इंदापूर तालुक्यातील निरगुडे या गावात खडकवासला धरणाचा डावा कालवा फुटल्याने पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले. कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, तसेच जवळच्या ओढ्यांमध्ये हा या कालव्याचा प्रवाह आल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी नागरी वस्ती नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
१४ तालुक्यांतील सरासरी पाऊस (मिमी)
पुणे जिल्ह्यातील मावळ (९६.५), बारामती (७७), दौंड (६४), शिरूर (६०.५), इंदापूर (५६.१), जुन्नर (५३.९), खेड (४४.७), मुळशी (४३.९), पुरंदर (४३.६), हवेली (३५.८), आंबेगाव (३०.५), वेल्हे (२६.९), भोर (२४.३), पुणे शहर (२१.३) आदी १४ तालुक्यांत गेल्या २४ तासांत सरासरी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक ९६.५ मिमी नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्याची सरासरी ५३.३ मिमी इतकी आहे.




