सातारा – जिल्ह्यात शनिवारी (दि.21)एका दिवसात 370 लसीकरण केंद्रांमधून तब्बल 61 हजार 893 इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांनी लसीकरण केले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
जिल्ह्यात आजअखेर 16 लाख 25 हजार 793 लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. यामध्ये 11 लाख 34 हजार 673 जणांनी पहिला डोस तर चार लाख 91 हजार 120 जणांनी दुसरा डोस देण्यात आला आहे . जिल्ह्यात 342 सरकारी केंद्रे असून 28 खासगी ठिकाणी हा लाभ देण्यात येत आहे. आरोग्य विभाग तसेच इतर कर्मचारी काटेकोर नियोजन करीत असल्याचे गौडा यांनी सांगितले.
आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक , विस्ताराधिकारी तसेच यांच्यापैकी गावनिहाय विशेष नियुक्त पालक अधिकारी, कार्यक्रमासाठी काही गावांसाठी क्षेत्रीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापासून ते गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी अशा सर्वच स्तरातील कर्मचारी अधिकारी यासाठी कष्ट घेत आहेत,अशी माहिती गौडा यांनी दिली.