नवी दिल्ली – रिफंड देण्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच कंपनी कर संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे दहा 10 नोव्हेंबरपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन सात टक्क्यांनी वाढून 12.82 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. या कालावधीत रिफंड 18 टक्क्यांनी कमी होऊन 2.42 लाख कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत झालेले कर संकलन 12.08 लाख कोटी रुपये होते. कंपन्यांचे ताळेबंद सुधारत आहेत. त्यामुळे या कालावधीत कंपनी कर संकलन 5.37 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही रक्कम 5.08 लाख कोटी रुपये होती. या सकारात्मक आकडेवारीचा परिणाम शेअर बाजारावरही होत आहे. वैयक्तिक आणि अविभक्त हिंदू कुटुंबाकडून झालेले कर संकलन 7.19 लाख कोटी रुपयांवर गेले. गेल्या वर्षी ही रक्कम 6.62 लाख कोटी रुपये होती. शेअर बाजारातील घडामोडी मंदावल्यामुळे रोखे विनिमय कर कमी होऊन 35,282 कोटी रुपये झाला. गेल्यावर्षीही रक्कम 35,923 कोटी रुपये होती. यावर्षी 10 नोव्हेंबरपर्यंत झालेले ढोबळकर संकलन 2.15 टक्क्यांनी वाढून 15.35 लाख कोटी रुपये झाले आहे. यावर्षी प्रत्यक्ष कर संकलनातून 25.70 लाख कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षापेक्षा ही रक्कम 12.7% जास्त आहे. रोखे विनिमय करातून या वर्षी सरकारला 78 हजार कोटी रुपयांची अपेक्षा आहे. मात्र शेअर बाजारातील परिस्थिती पाहता हे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येते. कर सवलतीचा परिणाम नाही अर्थसंकल्पात प्राप्तिकर उत्पन्न मर्यादा या वर्षी 12 लाख रुपयापर्यंत वाढवूनही नागरिकांचे उत्पन्न वाढत असल्यामुळे प्राप्तिकर संकलनावर फारसा परिणाम झालेला नाही. त्याचबरोबर परताव्याची रक्कम वेगाने कमी होत आहे. यामुळे अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे दिसून येते. आयपीओतील घडामोडी वाढत असल्यामुळे रोखे विनिमय कर संकलनात फारशी घट झालेली नाही.