पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ९४७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेने दुसऱ्यांदा साडेनऊशे काेटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात थंडावलेली वसुली, मनुष्यबळाचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही विभागाने नवा उच्चांक गाठला आहे. एकूण ७ लाख ३२ हजार मालमत्ता धारकांपैकी ६ लाख २७ हजार ७९० मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे महापाैर रवि लांडगे आणि आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ६ लाख २७ हजार ७९० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी ९४० काेटी रूपयांचा कर वसुल केला होता. यंदा महापालिका निवडणुकीच्या कामात कर संकलन विभागाचे कर्मचारी तीन महिने गुंतले हाेते. त्याचा फटका कर वसुलीला बसला. अन्यथा एक हजार काेटींच्या पुढे कर वसूल झाला असता. गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, माेठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध करणे, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक, रस्ते आदी ठिकाणी होर्डींग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मिडीयाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पिकरवर थकबाकीदारांच्या नावांची घाेषणा करणे, जाहिरात प्रसिद्धी, याचे फलित म्हणूनच ९४७ काेटी कर वसुल झाला आहे. असा आला रुपया ऑनलाइन – ७०६ कोटी ७२ लाख रोख – ८३ कोटी ८८ लाख धनादेशाद्वारे – ११० काेटी ५२ लाख ईडीसी – ६ लाख डीडी – ७ काेटी ९ लाख कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी औद्योगिक – ४ हजार ७८३ निवासी- ५ लाख ५२ हजार ४२ बिगरनिवासी – ५२ हजार २११ मिश्र – १३ हजार ६४७ मोकळ्या जमिन – ५ हजार ४९ इतर – ३१ एकूण ६ लाख २७ हजार ७९० वाकड झोनमधून उच्चांकी कर वसूल शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १८ झोन आहेत. यामध्ये वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. वाकडमध्ये ११७ कोटी १८ लाख ३८ हजार ९११, थेरगाव ९७ कोटी ६१ लाख ३३ हजार ९९३चिंचवड ७७ कोटी ३४ लाख ६८ हजार ८२४, चिखली कार्यालयाने ६७ कोटी ६० लाख ८५ हजार ५९१, किवळे ६४ कोटी ८९ लाख ७८ हजार ७१९, भोसरी ६३ कोटी ६९ लाख ८२ हजार ४५६ मोशी ६२ कोटी ५८ लाख ३० हजार ७८६, कस्पटे वस्ती ५७ कोटी ९२ लाख १३ हजार ४५८, पिंपरी वाघेरे ५० कोटी ७७ लाख २५ हजार १०६, सांगवी ४८ कोटी २८ लाख २५ हजार ५६२, मनपा भवन ४१ कोटी ४८ लाख १६ हजार ८००, आकुर्डी ४० कोटी ६० लाख ७१ हजार ५७५, चऱ्होली ३८ कोटी ४१ लाख २० हजार ८०३ फुगेवाडी ३५ कोटी ३० लाख ९८ हजार ७४९ , दिघी-बोपखेल २७ कोटी ४९ लाख २४ हजार ५५९, तळवडे – २६ कोटी १६ लाख २ हजार ४५२, निगडी प्राधिकरण २१ कोटी १ लाख ७३ हजार ८३२, पिंपरीनगर ८ कोटी ४२ लाख ४७ हजार १४५ असा कर वसुल झाला आहे. ‘कर संकलन विभागाचे उत्पन्न वाढीसाठी गेल्या काही महिन्यांपासून विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामुळेच साडेनऊशे कोटींचा मालमत्ता कर वसुल झाला आहे. आगामी आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येणार आहे.’- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका. ‘कर संकलन विभागाची माझ्याकडे २ फेब्रुवारीला जबाबदारी आली. दोन महिन्यांत कर वसुलीसाठी योग्य नियोजन केले. माझ्या दोन महिन्यांच्या कालावधीत अडीचशे कोटींचा कर वसूल करण्यात आला. त्यामुळेच दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटी रुपयांचा कर वसुल करण्यात यश आले आहे.’ – सचिन पवार, उपायुक्त, कर संकलन व कर आकारणी विभाग. हेही वाचा: मोठा चमत्कारच..! गुरुदेवजींच्या आशीर्वादामुळे घशाचा आजार बरा झाला, मुंबई महापौर रितू तावडेंचं वक्तव्य चर्चेत