Karad News – शहरातील मिळकतधारकांच्या संकलित कराची एकूण रक्कम 19 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम पालिकेने वसुल केली आहे. तर ‘मार्च एंड’पर्यंत शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पालिकेने आक्रमक भूमिका घेत थकबाकीधारकांची नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. कराड शहरात मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या माध्यमातून पालिकेला दरवर्षी कोट्यावधीचे उत्पन्न मिळते. कर रूपाने जमा होणार्या या रकमेतूनच नागरीकांना सोयीसुविधा पुरवल्या जातात. दरवर्षी मार्च अखेरपर्यंत पालिकेकडून शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात येते. यंदाही हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून पालिकेने कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यातच काही मिळकतधारकांनी वेळेत करभरणा करून पालिकेला उद्दिष्ट साध्य करण्यास हातभार लावला आहे. मात्र, अनेक मिळकतधारकांनी अद्यापही कराची रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे पालिकेचे कर वसुली पथक घरोघरी जाऊन थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वसुलीसाठी काही मिळकतधारकांची नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तर मोठ्या थकबाकीधारकांना तातडीने करभरणा करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. वेळेत कर न भरणार्या थकबाकीदारकांची नावे सार्वजनिक ठिकाणी फलकावर लावण्याचा निर्णयही पालिकेच्या विचाराधीन आहे.