महागाईचा विक्रमी उच्चांक; श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

कोलंबो – करोना महामारीत श्रीलंकाही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था खालवली असून महागाईने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून दुसरीकडे सरकारी तिजोरीदेखील रिकामी होत चालली आहे.
श्रीलंकेला पुढील 12 महिन्यांत अंदाजे 7.3 अब्ज डॉलरचे देशांतर्गत आणि परदेशी कर्जाची परतफेड करायची असल्याचे ब्रिटीश वृत्तपत्राने म्हंटले आहे.
यामध्ये जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बॉंडच्या 500 दशलक्ष डॉलरची रक्कमेची परतफेड करायची आहे. श्रीलंकेकडे नोव्हेंबरपर्यंत 1.6 अब्ज डॉलरचा परकीय चलनाचा साठा होता.
करोना महासाथीचा श्रीलंकेला मोठा फटका बसला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. करोनामुळे पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय, सरकारी पातळीवरून सातत्याने वाढत असलेला खर्च, कर कपात, राज्यांच्या महसुलात घट, परकीय गंगाजळीने गाठलेला नीचांक आणि चीनकडून घेतलेल्या मोठ्या कर्जाची परतफेड आदी महत्त्वांच्या कारणांमुळे श्रीलंका सरकारसमोरील आर्थिक आघाडीवरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे.
श्रीलंका सरकारने देशांतर्गत कर्ज आणि परदेशी कर्जरोखे फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चलन छपाई केली. त्यामुळे देशातंर्गत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डिसेंबर महिन्यात महागाईचा दर हा 9.9 टक्क्यांहून 12.6 टक्क्यांवर पोहचला.
डिसेंबर महिन्यातील खाद्यपदार्थांच्या किमतीतील महागाई दर 17.5 टक्क्यांवरून 22.1 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती श्रीलंकेच्या मध्यवर्ती बॅंकेने दिली.





