MSRTC : एसटी महामंडळाची विक्रमी कमाई; १६ दिवसांत ५४८.२२ कोटींचा महसूल
यंदाच्या सणासुदीच्या काळात नेहमीप्रमाणे हंगामी भाडेवाढ न करताही एसटी महामंडळाने दररोज सरासरी ३४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

MSRTC – दिवाळीनंतर गावी गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या गर्दीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत ५४८.२२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
यामध्ये सोमवारी एकाच दिवसात ४६.५३ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करत महामंडळाने आजवरचा उच्चांक गाठल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, यंदाच्या सणासुदीच्या काळात नेहमीप्रमाणे हंगामी भाडेवाढ न करताही एसटी महामंडळाने दररोज सरासरी ३४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात राज्यातील काही भागांत असलेला दुष्काळ आणि महिला सन्मान योजनेशी संबंधित इतर काही कारणांमुळे महामंडळाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता.
मात्र, नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि लागून आलेल्या सुट्ट्या, प्रवाशांची वाढलेली गर्दी तसेच योजनेच्या अंमलबजावणीत दिलेल्या काही सवलतींमुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत यंदा एसटीने सणासुदीची तात्पुरती भाडेवाढ लागू केली नाही. त्यामुळे प्रवाशांना नियमित तिकीट दरात प्रवास करता आला आणि खासगी बस वाहतूकदारांना एक किफायतशीर पर्याय म्हणून एसटीचे स्थान अधिक मजबूत झाले, असे या पत्रकात म्हटले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, गर्दीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर केल्याबद्दल महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचे त्यांनी कौतुक केले आहे.






