माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मंदीचे सावट; टीसीएस कंपनीचा शेअर घसरला

मुंबई : पहिल्या तिमाहित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होत असल्याची आकडेवारी बाहेर येत आहे. अशातच टीसीएस कंपनी 12,000 कर्मचार्यांना कमी करणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे टीसीएस कंपनीच्या शेअरचा भाव सोमवारी दोन टक्क्यांनी कमी झाला. दरम्यान सरकारनेही या घटनाक्रमाची दखल घेतली असून या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी टीसीएस कंपनीचा शेअर 1.76 टक्क्यांनी कमी होऊन 3,079 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार यावर्षी कंपनी आपले दोन टक्के कर्मचारी म्हणजे 12,261 कर्मचारी कमी करणार आहे. ही कर्मचार्यांची कपात मध्य आणि उच्च पातळीवरील क्षेत्रात असेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. 30 जून 2025 रोजी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार टीसीएस कंपनीकडे 6,13,069 कर्मचारी काम करीत होते. जून अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने 5,000 नवीन कर्मचारी घेतले होते.
कर्मचारी कपातीबद्दल टीसीएस कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कंपनी भविष्याच्या दृष्टिकोनातून स्वतःला पुनर्रचित करीत आहे. आगामी काळात नव्या तंत्रज्ञानावर भर देणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यात येणार आहे. कर्मचार्यांची फेररचना केली जाणार असून विविध क्षेत्रात काम वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जागतिक स्थूल अर्थव्यवस्थेवर आणि विविध देशातील संबंधावर नकारात्मक परिणाम झाल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे. याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरही होत आहे.
दरम्यान या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. एकीकडे सरकार विविध उपायोजनाद्वारा रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मात्र नकारात्मक परिणाम होत असल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात सरकार या कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.
फेररचनेचा परिणाम
सध्याच्या परिस्थितीत कर्मचार्यांची फेररचना करावी लागणार आहे. कर्मचार्यांना नवी कौशल्य शिकवावी लागणार आहेत. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर कंपनीकडे असलेल्या दोन टक्के कर्मचार्यांची कंपनीला फारशी आवश्यकता राहणार नाही. हे कर्मचारी मध्यम आणि उच्च पातळीवर कार्यरत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या कर्मचार्यांना योग्य नुकसान भरपाई आणि नवे काम मिळविण्यासाठी कंपनी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.





