TCS Q4FY26 Results: नफा 13,718 कोटींवर, 31 रुपये डिविडेंडची घोषणा! TCSच्या निकालांनी गुंतवणूकदारांना दिलं मोठं सरप्राइज
TCS Q4FY26 Results: गुरुवारी BSE वर TCS चा शेअर 1.09 टक्क्यांनी वाढून ₹2,587.75 वर बंद झाला. याउलट, प्रमुख निर्देशांकात 1.20 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

TCS Q4FY26 Results: देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने गुरुवारी आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे (Q4FY26) निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा, महसूल आणि लाभांश या तिन्ही बाबींमध्ये वाढ दिसून आली आहे.
नफ्यात लक्षणीय वाढ –
जानेवारी ते मार्च 2026 या तिमाहीत TCS चा निव्वळ नफा 12.22 टक्क्यांनी वाढून ₹13,718 कोटींवर पोहोचला. मागील वर्षी याच तिमाहीत (Q4FY25) हा नफा ₹12,224 कोटी होता. तसेच तिमाही आधारावरही (QoQ) नफ्यात 28.72 टक्क्यांची वाढ झाली असून डिसेंबर तिमाहीत कंपनीने ₹10,657 कोटी नफा नोंदवला होता.
पूर्ण आर्थिक वर्ष 2025-26 साठी कंपनीचा एकूण निव्वळ नफा 1.35 टक्क्यांनी वाढून ₹49,210 कोटी झाला, जो FY25 मध्ये ₹48,553 कोटी होता.
हेही वाचा – Stock Market: ‘या’ कारणांमुळे शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण
महसुलात जवळपास 10% वाढ –
कंपनीच्या ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल (Revenue) Q4FY26 मध्ये 9.64 टक्क्यांनी वाढून ₹70,698 कोटी झाला. मागील वर्षी याच कालावधीत तो ₹64,479 कोटी होता. पूर्ण आर्थिक वर्षासाठी (FY26) महसूल 4.58 टक्क्यांनी वाढून ₹2.67 लाख कोटींवर पोहोचला.
₹31 प्रति शेअर अंतिम लाभांश –
कंपनीच्या संचालक मंडळाने FY26 साठी ₹31 प्रति शेअर अंतिम लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांच्या मंजुरीनंतर देण्यात येणार आहे. संपूर्ण वर्षभरात कंपनीने लाभांशाच्या स्वरूपात एकूण ₹39,571 कोटींचे वितरण केले.
मेगा डील्समुळे वाढीला चालना –
कंपनीचे सीईओ आणि एमडी के. कृतीवासन (K. Krithivasan) यांनी सांगितले की, सलग तिसऱ्या तिमाहीत वाढ नोंदवण्यात आली असून ती तीन मोठ्या करारांमुळे (मेगा डील्स) आणि 12 अब्ज डॉलरच्या TCV मुळे शक्य झाली. कंपनीची ‘AI-आधारित’ सेवा आणि पाच स्तंभांची रणनीती मजबूत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच जागतिक आर्थिक आव्हाने कायम असली तरी ग्राहकांचा तंत्रज्ञान गुंतवणुकीवरील विश्वास मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेअर बाजारातील कामगिरी –
गुरुवारी BSE वर TCS चा शेअर 1.09 टक्क्यांनी वाढून ₹2,587.75 वर बंद झाला. याउलट, प्रमुख निर्देशांकात 1.20 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.





