‘कबीर सिंग’ची रिअल लाईफ स्टोरी! डॉक्टर पती दारुच्या आहारी, १९ दिवसांत नात्याचा शेवट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – कबीर सिंग चित्रपटासारखीच स्थिती एका जोडप्याच्या आयुष्यात निर्माण झाली. पती डॉक्टर व पत्नी एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरदार. पती डॉक्टर असूनही मद्याच्या आहारी गेलाने त्यांचा संसार फिस्कटला. लग्नाच्या तीन वर्षांनी जोडपे विभक्त झाले. दोघांचे वय आणि पुनर्विवाहाची शक्यता लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाने सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी रद्द करीत, जोडप्याचा परस्पर संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी हा निकाल दिला.
राकेश (वय ३०) आणि स्मिता (वय २९) (नावे बदललेली) यांचे लग्न १४ जून २०२० मध्ये झाले. दोघेही कमावते आहेत. मात्र, पतीला मद्याचे व्यसन होते. या व्यसनामुळे हिंसाचार आणि पती-पत्नीतील संबंध ताणले गेले. वैचारिक मतभेद आणि विसंगतीमुळे अखेर लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघे वेगळे राहू लागले. दोघांनी ॲड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. कुटुंबांनीदेखील दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, दोघांचे समुपदेशनही झाले.
मात्र, दोघे पुन्हा एकत्र येणे शक्य नसल्यामुळे सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी रद्द करण्याची मागणी जोडप्याच्या वतीने ॲड. कुलकर्णी यांनी केली.त्यानुसार न्यायालयाने पक्षकारांचे वय आणि पुनर्विवाहाची शक्यता लक्षात घेऊन कूलिंग ऑफ कालावधी रद्द करीत परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला. ॲड. निखिल कुलकर्णी यांना ॲड. मेहरपूजा माथूर यांनी सहकार्य केले. दावा दाखल केल्यापासून १९ दिवसांच्या आत हा दावा निकाली निघाला.





