Top 10 News : मुंबईत पावसाचे थैमान ते CM विजय यांच्या अडचणीत वाढ…; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : मुंबईत पावसाचे थैमान ते CM विजय यांच्या अडचणीत वाढ...; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १) मुंबईत पावसाचे थैमान, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, पुढील २४ तासांसाठी धोक्याचा इशारा
मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मानखुर्दमधील चाळ कोसळून 6, झाडे कोसळल्याने अनेकांचा, तर शाळेच्या बसवर झाड पडून एका 11 वर्षीय मुलाचाही मृत्यू झालाय. हवामान विभागाने मुंबईसह पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करत पुढील 24 ते 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिलाय. ठाण्यात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने 200 हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेय. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. (Top 10 News)
२) वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केलेय. इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने देहू आणि आळंदी परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी न करता थेट 10 जुलै रोजी पुण्यात दाखल व्हावे, असे मुख्यमंत्री म्हणालेत. वारीसाठी शासनाने निवारा, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन केले असून जर्मन हँगर उभारून सुरक्षित निवाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आलीय. राज्य प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून वारकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलेय. (Top 10 News)
३) महाराष्ट्रात तात्काळ आणीबाणी जाहीर करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
राज्यातील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि विविध दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात तात्काळ आणीबाणी जाहीर करण्याची मागणी केलीय. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प, आळंदीतील पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्र अक्षरशः ठप्प झाल्याचे त्यांनी म्हटले. मिसिंग लिंक प्रकल्पावर मोठा निधी खर्च करूनही अपेक्षित सुरक्षितता दिसत नसल्याचा आरोप करत त्यांनी सेफ्टी ऑडिट झाले का, याची माहिती जाहीर करण्याची मागणी केलीय. तसेच वसई-विरार, भांडूपसह विविध प्रकल्पांची पारदर्शक चौकशी करून सरकारने राज्यातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, असेही सुळे यांनी स्पष्ट केलेय. (Top 10 News)
४) सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसलाय. परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे विश्वासू नेते प्रताप देशमुख यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण दिले असले तरी परभणीतील स्थानिक राजकीय समीकरणे आणि निवडणुकीतील पक्षाच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. राष्ट्रवादीने जागेवरील दावा सोडल्याने देशमुख नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मराठवाड्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे नाराज नेत्यांना पक्षात घेण्यावर भर देत असून, प्रताप देशमुखांच्या संभाव्य प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Top 10 News)

५) CM विजय यांच्या अडचणीत वाढ! करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. करूर येथील टीव्हीके रॅलीतील चेंगराचेंगरी प्रकरणी डीएमकेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी होणार आहे. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू, तर 142 जण जखमी झाले होते. डीएमकेने मंत्री आधव अर्जुन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची आणि सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत टीव्हीकेच्या मंत्र्यांना या प्रकरणावर सार्वजनिक वक्तव्य करण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. पीडित कुटुंबीयांशी थेट संपर्कामुळे चौकशीच्या निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या सुनावणीकडे आता संपूर्ण तामिळनाडूचे लक्ष लागले आहे. (Top 10 News)
६) तीन राज्यांत विधानसभा पोटनिवडणुका जाहीर; 30 जुलैला मतदान
भारतीय निवडणूक आयोगाने बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केलीय. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात 30 जुलै रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 जुलै असून, 14 जुलैला छाननी आणि 16 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 4 ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. बांकीपूर मतदारसंघ नितीन नबिन यांच्या राजीनाम्यामुळे, मंजलपूर जागा योगेशभाई पटेल यांच्या निधनामुळे, तर दतिया मतदारसंघ राजेंद्र भारती यांच्या अपात्रतेमुळे रिक्त झाला होता. (Top 10 News)
७) श्रीलंकेतील तुरुंगात दंगल; २५ कैद्यांचा मृत्यू, शेकडो जखमी
श्रीलंकेतील नेगोमबो शहरातील तुरुंगात कैद्यांच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये झालेल्या भीषण दंगलीत किमान २५ कैद्यांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झालेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी असलेल्या तुरुंगात रविवारी सुरू झालेला संघर्ष सोमवारी आणखी तीव्र झाला. दंगलखोर कैद्यांनी सुरक्षा रक्षकांकडील बंदुका हिसकावून घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. कारागृह प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रयत्नांनंतर परिस्थिती आटोक्यात आणली. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर तुरुंग परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दंगलीचे नेमके कारण आणि सुरक्षेतील त्रुटींचा तपास सुरू असून, या घटनेमुळे श्रीलंकेतील कारागृह व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Top 10 News)
८) महागाईचा फटका पुन्हा बसणार; मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार?
मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपन्या येत्या 3 ते 4 महिन्यांत मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या दरात 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ‘सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च’च्या अहवालानुसार, 5G नेटवर्कवरील मोठी गुंतवणूक, वाढता डेटा वापर आणि प्रति ग्राहक महसूल (ARPU) वाढवण्यासाठी कंपन्या हा निर्णय घेऊ शकतात. 2G वरून 4G आणि 5G कडे ग्राहकांचे वाढते स्थलांतरही दरवाढीचे प्रमुख कारण मानले जात आहे. अहवालानुसार, रिलायन्स जिओ आणि एअरटेलचा ग्राहकवर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून, देशभरात 5G सेवांचा विस्तार वेगाने सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मासिक मोबाईल खर्चात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (Top 10 News)
९) ‘वेल्कम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; 10 दिवसांत 114.90 कोटींची कमाई
अक्षय कुमारचा ‘वेल्कम टू द जंगल’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. अहमद खान दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने दुसऱ्या रविवारीही जोरदार कमाई करत 100 कोटींचा टप्पा सहज पार केला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार, चित्रपटाने दहाव्या दिवशी 9.75 कोटी रुपयांची कमाई केली. याआधी पहिल्या आठवड्यात 93.15 कोटी, आठव्या दिवशी 4.50 कोटी आणि नवव्या दिवशी 7.50 कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे 10 दिवसांत चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 114.90 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आलिया भट्टच्या ‘अल्फा’ चित्रपटाची स्पर्धा असूनही ‘वेल्कम टू द जंगल’ची कमाई कायम मजबूत आहे. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याने चौथे स्थान मिळवले असून, लवकरच आणखी मोठे विक्रम करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (Top 10 News)

१०) पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! आकृतीने पुन्हा शेअर केली नवी इन्स्टा स्टोरी
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी आकृती अग्रवाल यांच्यातील ब्रेकअपच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आकृतीने इन्स्टाग्रामवरून पृथ्वीसोबतचे साखरपुड्याचे फोटो डिलीट करत त्याला अनफॉलो केल्यामुळे दोघांचे नाते तुटल्याची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच तिची एक ‘विश्वासघाताची’ कथित स्टोरीही व्हायरल झाली होती. मात्र, अवघ्या काही तासांतच या ड्राम्यात नवा ट्विस्ट आला आहे. दोघांनी पुन्हा एकमेकांना फॉलो केले असून आकृतीच्या प्रोफाइलवर साखरपुड्याचे फोटो परत आले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना आकृतीने इन्स्टा स्टोरीवर, “बऱ्याच लोकांनी चुकीचा समज करून घेतला” असे लिहीत पॅच-अपचे संकेत दिले आहेत. (Top 10 News)





