Top 10 News : आशा भोसले यांचं निधन ते महाराष्ट्राला मिळाली पहिली वंदे भारत…; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.

Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 12 एप्रिल 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… (Top 10 News )
१) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आलीय. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात बहुआयामी गायिका म्हणून त्यांची ओळख होती. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये हजारो गाण्यांना आवाज दिला. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अंत्यदर्शन होणार असून, त्यानंतर अंत्ययात्रा निघेल. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
२) आशाताईंच्या निधनावर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
ज्येष्ठ गायिका अशा भोसले यांच्या निधनावर राज्यभरातून शोक व्यक्त केला जातोय. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरलीय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. त्यांचा उत्साह आणि जिंदादिल व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होतं,” असं म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी “सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आशाताईंच्या गायकीतील माधुर्य आणि विविधतेचंही कौतुक केलं. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत, “त्यांचा स्वर कालातीत राहील,” असं सांगितलं. आशाताईंच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाय.
३) भोंदू बाबाची शक्तीपीठ महामार्ग परिसरात 11 एकर जमीन
भोंदू बाबा अशोक खरात याच्या मालमत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. पुणे, नाशिक, शिर्डीनंतर आता सोलापूर कनेक्शनही उघड झालंय. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात खरातने सुमारे ११ एकर जमीन खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय. या व्यवहाराची किंमत तब्बल २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे ही जमीन खरातच्या पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आलीय. या भागातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतरच ही खरेदी झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. स्थानिक बाजारभावापेक्षा तब्बल तीनपट जास्त दराने जमीन खरेदी केल्यामुळे या व्यवहारावर संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणामुळे तपास यंत्रणांचे लक्ष आणखी वेधले गेले आहे.
४) महाराष्ट्राला मिळाली पहिली वंदे भारत स्लीपर; अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
मुंबई, पुणेकरांचे वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. अश्विनी वैष्णव यांनी मुंबई ते बंगळुरू दरम्यान ही सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केलीय. ही ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते केएसआर बंगळुरू दरम्यान धावणार आहे. सध्या २२-२३ तास लागणारा प्रवास आता सुमारे १६ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. १६ डब्यांची ही ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावू शकते आणि सुमारे ८२३ प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतील. रात्रीच्या वेळेत ही ट्रेन चालवली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.
५) बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा सस्पेन्स संपला; जेडीयू समर्थकांनी निशांत याचे लावले पोस्टर
बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अधिकच रंगतदार झालाय. नितीशकुमार यांच्या शपथविधीनंतर पुढील मुख्यमंत्री कोण, याबाबत चर्चा सुरू असतानाच निशांत कुमार यांचं नाव पुढे येतंय. जनता दलच्या समर्थकांनी पाटण्यात निशांत कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावलेत. “बिहारला बुलडोझर नाही, तर तुमची सावली हवी,” असा भावनिक संदेशही या पोस्टर्सवर देण्यात आलाय. “मिशन डेव्हलप्ड बिहार-2040 पूर्ण करण्यासाठी निशांत कुमारच योग्य,” असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातोय. या पोस्टर्समुळे बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्रीपदाची चर्चा अधिकच तापली आहे.
६) “इराणला शस्त्र पुरवल्यास चीनला संकटाचा सामना करावा लागेल”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा दिलाय. इराणला शस्त्रास्त्र पुरवठा केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. चीनकडून इराणला हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता अमेरिकन गुप्तचर अहवालात व्यक्त करण्यात आलीय. ‘सीएनएन’च्या अहवालानुसार, चीन तिसऱ्या देशांच्या माध्यमातून हा पुरवठा करू शकतो. दरम्यान, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील तणावपूर्ण युद्धविराम धोक्यात आल्याचीही भीती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडालीय.
७) डिझेलच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय
डिझेलच्या दरांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने हाय-स्पीड डिझेलवरील निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्राने डिझेलवर २४ रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क आणि ३६ रुपये प्रति लिटर इन्फ्रा सेस वाढवलाय. यापूर्वी २६ मार्च रोजीही डिझेलवर २१.५० रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. आता ही रक्कम थेट ५५.५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढलीय. या निर्णयामुळे देशांतर्गत इंधनाची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, याचा थेट परिणाम ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. डिझेलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसू शकतो.
८) महिंद्राने Thar ROXX स्टार एडिशन केली लाँच; अशी आहेत हटके फिचर्स!
भारतीय बाजारात महिंद्राने आपल्या लोकप्रिय SUV Mahindra Thar ROXX चं ‘स्टार एडिशन’ लाँच केलं आहे. या नवीन व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹16.85 लाख आहे. या एडिशनमध्ये प्रीमियम लूकसाठी पियानो-ब्लॅक ग्रिल, अलॉय व्हील्स आणि ऑल-ब्लॅक लेदरेट इंटीरियर देण्यात आलं आहे. तसेच व्हेंटिलेटेड सीट्समुळे ड्रायव्हिंग अधिक आरामदायी होतं. इंजिनबाबत बोलायचं झाल्यास, यात 2.0 लिटर पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. फीचर्समध्ये मोठी टचस्क्रीन, 360 डिग्री कॅमेरा, हरमन कार्डन साउंड सिस्टम आणि 6 एअरबॅग्सचा समावेश आहे. स्टाइल, लक्झरी आणि दमदार परफॉर्मन्सचा संगम असलेली ही SUV ग्राहकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
९) अक्षय कुमारला पाहण्यासाठी चाहत्यांची उसळली गर्दी; बॅरीकेड्सची तोडफोड
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या एका झलकसाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळल्याची घटना समोर आलीय. दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथील मॉलमध्ये ही घटना घडलीय. आपल्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार येथे पोहोचला होता. त्याच्यासोबत वामिका गब्बी आणि राजपाल यादव हे कलाकारही उपस्थित होते. मात्र, हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. काहींनी बॅरिकेड्स तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुदैवाने, कोणतीही मोठी दुर्घटना टळली असून, अक्षय कुमारने शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.
१०) डगआउटमध्ये मोबाईलचा वापर; राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर कारवाईची टांगती तलवार
आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झालेत. बीसीसीआयच्या ‘पीएमओए’ (PMOA) प्रोटोकॉलनुसार, थेट सामन्यादरम्यान डगआउटमध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या नियमांच्या उल्लंघनाची पुष्टी केली असून भ्रष्टाचार विरोधी युनिट (ACU) या प्रकरणाचा तपास करत आहे. या चुकीसाठी भिंडर यांना ताकीद दिली जाऊ शकते किंवा काही सामन्यांची बंदी देखील घातली जाऊ शकते. वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसून फोन वापरल्याने हा वाद अधिक वाढला असून आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल यावर अंतिम निर्णय घेईल.





