बाळ बोठेच्या घराची पुन्हा झाडाझडती; पोलिसांच्या हाती महत्त्वाच्या वस्तू

नगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पुन्हा पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यामध्ये महत्त्वाचे वस्तू हाती लागल्या असल्याचे पोलीस सूत्राकडून समजते. तसेच बोठे याची शनिवारी (दि.20) रोजी पोलीस कोठडी संपत असून त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघा जणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावत अत्यल्प काळात यातील पाच संशयित आरोपींना जेरबंद होते.
मात्र, या घटने मागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात समोर आले.तेव्हापासून बोठे गेल्या 102 दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली.
अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपत असून त्याला पुन्हा पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, बालिकाश्रम रस्त्यावरील बाळ बोठे याच्या घराची शुक्रवारी पुन्हा झाडाझडती पोलिसांनी बोठेच्या उपस्थित घेतली. यामध्ये महत्त्वाच्या वस्तू ही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यामुळे बोठेच्या अडचणीत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसत आहे.





