Jammu & Kashmir : नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी ‘फारूख अब्दुल्लां’ची फेरनिवड

श्रीनगर – फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांची पुन्हा एकदा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील नसीम बाग येथे पक्षाचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या समाधीजवळ झालेल्या पक्ष प्रतिनिधींच्या अधिवेशनात 85 वर्षीय अब्दुल्ला यांची एकमताने पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
आज पक्षाचे दिवंगत नेते व संस्थापक शेख अब्दुल्ला यांची 117 वी जयंती देखील आहे. पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठीच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ फारूख अब्दुल्ला यांचाच एकट्याचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिन विरोध निवड जाहीर करण्यात आली.
काश्मीरमधून एकूण 183, जम्मूमधून 396 आणि लडाखमधून 25 प्रस्ताव फारुख अब्दुल्ला यांच्या समर्थनार्थ प्राप्त दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे फारूख अब्दुल्ला यांनी अलीकडेच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाने अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आणि पक्षाच्या प्रतिनिधींच्या अधिवेशनात नवीन अध्यक्ष निवडला जाईल असे सांगितले. तथापि फारूख अब्दुल्ला यांनी पुन्हा हे पद स्वीकारण्यास संमती दिली.





