राज्यातील ‘या’ मतदार संघात होणार फेरमतमोजणी; विरोधकांच्या मागणीनंतर निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sudhakar Badgujar | राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मात्र विरोधकांकडून ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे. यातच आता ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघात महायुतीतील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे एक लाख ४१ हजार ७२५ मतांनी विजयी झाल्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.
फेर मतमोजणीला एकूण खर्च सांगायचा झाला तर, बडगुजर यांना प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्रांची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकार तथा जिल्हाधिकाऱ्यानी बडगुजर यांना पत्र दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा हिरे यांनी ६८ हजार १७७ मतांनी पराभव केला. बडगुजरांना ७३ हजार ५४८ मते मिळाली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांना ४६ हजार ६४९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावाने देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे.





