RCB vs PBKS Final : विराट कोहलीने फायनलमध्ये रचला नवा इतिहास, मोडला शिखर धवनचा खास विक्रम

RCB vs PBKS Final Virat Kohli Breaks Shikhar Dhawan Record : आयपीएल २०२५ चा फायनल सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला १९१ धावांचे लक्ष्य दिले. दरम्यान या सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो ३५ चेंडूत ४३ धावाच करु शकला. यानंतरही त्याने आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम केला आहे, ज्यामध्ये त्याने शिखर धवनला मागे टाकले.
विराटने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास –
विराट कोहली आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने ४३ धावांच्या खेळीत एकूण तीन चौकार मारले. यासह, आता आयपीएलच्या इतिहासात कोहलीच्या नावावर एकूण ७७१ चौकारांची नोंद झाली आहे. कोहलीपूर्वी, नंबर-१ स्थानावर असलेल्या शिखर धवनने आयपीएलच्या इतिहासात एकूण ७६८ चौकार मारण्याचा विक्रम केला होता. विराटने हा पल्ला २६७ व्या सामन्यात गाठला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू:
- विराट कोहली – ७७१ चौकार
- शिखर धवन – ७६८ चौकार
- डेव्हिड वॉर्नर – ६६३ चौकार
- रोहित शर्मा – ६४० चौकार
- अजिंक्य रहाणे – ५१४ चौकार
हेही वाचा – RCB vs PBKS Final : आरसीबीची तुफान सुरुवात, आयपीएल फायनलमध्ये रचला नवा इतिहास!
विराटने मोडला स्वतःचाच विक्रम –
विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एक संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध एकूण ११४६ धावा करणाऱ्या कोहलीने आता हा आकडा ओलांडला आहे आणि पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये एकूण ११५९ धावा केल्या आहेत. सामन्याबद्दल बोलायचे तर बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत नऊ विकेट गमावून १९० धावा केल्या. जर पंजाबला जेतेपद मिळवायचे असेल तर त्यांना १२० चेंडूंत १९१ धावा कराव्या लागतील. अर्शदीपने २० व्या षटकात तीन विकेट घेतल्या आणि बंगळुरूला १९० च्या धावसंख्येवर रोखले. त्याने शेवटच्या षटकात शेफर्ड, कृणाल आणि भुवनेश्वरचे विकेट घेतले.





