लखनौ : जितेश शर्माने नाबाद अर्धशतक, विराट कोहलीचे अर्धशतक तर मयंक आग्रवालची वादळी फलंदाजी यांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने आयपीएल स्पर्धेत मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर टॉप-२ मध्ये स्थान मिळवलेल्या बंगळुरुचा क्वालिफायर एकचा सामना येत्या गुरुवारी पंजाब किंग्जशी होणार असून त्यातील विजेता थेट अंतिम पेरीत पात्र ठरेल तर पराभूत संघाला क्वालिफायरची दुसरी लढत खेळण्याची संधी मिळेल. लखनौने विजयासाठी दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवातच धडाक्यात झाली. सलामीवीर विराट कोहली व फिल सॉल्ट यांनी पॉवरप्ले संपण्यापूर्वीच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यांनी जोमाने धावा केल्या. सॉल्ट अनावश्यक फटका मारत ३० धावांवर परतला. त्याने १९ चेंडूत ६ चौकार मारले. सॉल्ट बाद झाल्यावर आलेल्या रजत पाटीदारने आश्वासक सुरुवात केली होती मात्र, तो देखील अनावश्यक फटका खेळत बाद झाला. त्याने ७ चेंडूत १ चौकार व १ षटकारासह १४ धावा केल्या. कोहलीने एक बाजू लवून धरताना तडाखेबंद अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी मयंक आग्रवाल फलंदाजीला आला. या जोडीने संघाचे शतक फलकावर लावले. अर्धशतकानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात कोहली ५४ धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत ३० चेंडूत १० चौकार फटकावले. यानंतर कर्णधार जितेश शर्मा व आग्रवाल ही जोडी जमली व त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचे दीडशतकही फलकावर लावले. जितेशने षटकार खेचत आपले अर्धशतक साकार केले. या जोडीने संघाचे द्विशतकही फलकावर लावले. या जोडीने अखंडीत शतकी भागीदारी केली. जितेशने षटकार खेचत बंगळुरुचा विजय साकार केला. धावफलक – रॉल चॅलेंजर बंगळुरु – १८.४ षटकांत ४ बाद २३० धावा. (विराट कोहली ५४, जितेश शर्मा नाबाद ८५, मयंक आग्रवाल नाबाद ४१, विल्यम ओरुर्क २-७४). पंतचे शतक व्यर्थ लखनौचा कर्णधार ऋऋभ पंतने या सामन्यात शानदार शतकी खेळी केली. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनी केलेली दीशाहीन गोलंदाजी व अत्यंत ढिसाळ क्षेत्ररक्षण यांच्यामुळे लखनौला हा सामना गमवावा लागला. पंतने ६१ चेंडूत ११ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ११८ धावांची खेळी केली. मात्र तरीही त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.