RCB : आरसीबीच्या चाहत्यांसाठी IPL 2026 पूर्वी मोठी बातमी! होम ग्राऊंड पुणे असणार की बंगळुरु? झालं स्पष्ट

RCB Chinnaswamy Stadium Ban Lifted IPL 2026 : आयपीएलच्या १९ व्या (IPL 2026) हंगामासाठी १६ डिसेंबरला अबू धाबी येथे लिलाव होणार असतानाच, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी हंगामात आरसीबीचे होमग्राऊंड बदलले जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांचे सामने पुण्यात खेळवले जातील अशी दाट शक्यता होती. मात्र, आता याबाबत आरसीबीच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती काय आहे? जाणून घेऊया.
मागील १८ व्या हंगामात आरसीबीने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर बंगळूरमध्ये ‘विजय परेड’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चाहत्यांची प्रचंड गर्दी जमल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट सामने आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता ही बंदी उठवल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
कर्नाटक सरकारने दिली सशर्त परवानगी –
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (KSCA) नवे प्रमुख आणि माजी भारतीय खेळाडू वेंकटेश प्रसाद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्टेडियमवरील बंदी उठवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी याबाबत अधिकृत विधान केले आहे.
शिवकुमार म्हणाले, “बंगळूरच्या सन्मानाचा विचार करून आम्ही काही आवश्यक पाऊले उचलली आहेत. आम्ही काही अटींसह सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये सुरक्षेसाठी आणि बचावासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश आहे.” सामन्यांदरम्यान बचावासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची जबाबदारी गृहमंत्री परमेश्वर यांच्याकडे देण्यात आली आहे. केएससीएचे अध्यक्ष वेंकटेश प्रसाद आणि त्यांची टीम पोलीस विभागाशी चर्चा करून आवश्यक व्यवस्था करेल.
आरसीबीच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला –
आयपीएलमध्ये आरसीबीच्या चाहत्यांची प्रचंड क्रेझ आहे. जेव्हा आरसीबीचा संघ आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच एम. चिन्नास्वामीवर खेळतो, तेव्हा मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहून संघाला पाठिंबा देतात. त्यामुळे होम ग्राउंडवर सामने आयोजित करण्यास मिळालेली परवानगी आरसीबी चाहत्यांसाठी मोठी दिलासादायक आहे. सध्या सर्व क्रिकेट जगताचे लक्ष १६ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाकडे लागले आहे. आरसीबीकडे यावेळी ६ खेळाडू विकत घेण्याची संधी असून, त्यांच्या पर्समध्ये एकूण १६.४ कोटी रुपये शिल्लक आहेत.





