IPL 2025 Retention : बंगळुरूने ‘या’ तीन खेळाडूंना ठेवलं कायम; विराटवर RCB ने केला पैशांचा वर्षाव…..

RCB Full Retention List : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. संघाने गुरुवारी अनुभवी फलंदाज विराट कोहलीला 21 कोटी रुपये देऊन कायम ठेवले. आरसीबीने यावेळी फक्त तीन खेळाडूंना रिटेन केले आहे, उर्वरित दोन खेळाडूंमध्ये रजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल (5 कोटी) यांचा समावेश आहे.
यासह यंदा संघ विराटला आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार बनवण्याची शक्यता बळावली आहे. तीनदा अंतिम फेरी गाठताना आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराटचा आयपीएलमधील विक्रम पाहता त्याला कायम ठेवण्याचा फ्रँचायजींनं निर्णय घेतला आहे.
विराटनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 252 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 38.67 च्या सरासरीने आणि 131.97 च्या स्ट्राइक रेटने 8004 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे. या लीगमध्ये विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, तर शिखर धवन 6769 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा 6628 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आरसीबीने यावेळी फाफ डू प्लेसिसला कायम ठेवलेले नाही, त्यामुळे विराटने संघाची धुरा सांभाळणे अपेक्षित आहे. 2021 मध्ये कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर डु प्लेसिसकडे संघाची कमान होती. यावेळी, आरसीबीने दीर्घकाळचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला कायम ठेवले नाही, ज्याला 2022 च्या मेगा लिलावापूर्वी 7 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते.
साल 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादमधून आरसीबीमध्ये सामील झालेल्या सिराजने संघासोबत सात हंगामात 83 विकेट घेतल्या. संघ राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून मेगा लिलावात सिराजला आपल्या संघात समाविष्ट करू शकतो.
12th Man Army, your cheers have echoed! 📣
We’ve retained the stars you championed for, and we’re thrilled to welcome them back! Together, let’s make this season unforgettable. 💪 #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #IPLRetention pic.twitter.com/4Xqf79akr6
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) October 31, 2024
आरसीबीने तीन खेळाडूंना कायम ठेवले असून त्यांच्यावर एकूण 37 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता हा संघ मेगा लिलावात उतरेल तेव्हा त्याच्या खिशात 83 कोटी रुपयांचे बजेट असेल. या मोठ्या रकमेतून आरसीबी त्यांच्या संघात काही खास खेळाडूंचा समावेश करू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कायम ठेवलेलं खेळाडू :
1. विराट कोहली : 21 कोटी रु.
2. रजत पाटीदार : 11 कोटी रु.
3. यश दयाल : 5 कोटी रु.





