परवडणाऱ्या घरांची मागणी वाढेल: आरबीआयच्या व्याजदर कपातीमुळे रिअल्टी क्षेत्राला दिलासा

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदरात ०.२५% कपात केल्याने रिअॅल्टी आणि वाहन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. करोनानंतर रिअॅल्टी क्षेत्रात फक्त महागड्या घरांच्या विक्रीत वाढ झाली होती, कारण जास्त व्याजदरामुळे स्वस्त घरांची निर्मिती आणि मागणी कमी झाली होती. आता व्याजदर कपातीमुळे १ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची मागणी आणि निर्मिती वाढण्याची शक्यता विकसकांनी व्यक्त केली आहे. मात्र, बँकांनी ही कपात लवकर लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रॉपइक्विटीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च २०२५ मध्ये घर विक्री २३% कमी झाली, तर अॅनारॉकच्या माहितीनुसार ती २८% घसरली. आता व्याजदर कपातीमुळे भांडवली परिस्थिती सुलभ झाल्याने विक्री वाढण्याची आशा आहे. क्रेडायचे अध्यक्ष बोम्मन इराणी आणि नारडॅकोचे अध्यक्ष जी हरी बाबू म्हणाले, “मंदीच्या काळात रिअॅल्टी क्षेत्राला चालना मिळाल्यास अर्थव्यवस्थेतील योगदान वाढेल.”
वाहन क्षेत्रानेही या कपातीचे स्वागत केले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष शैलेश चंद्र म्हणाले, “प्राप्तिकर मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढल्यानंतर आता व्याजदर कपात झाल्याने दुचाकी खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन क्षेत्राला दिलासा मिळेल.” व्याजदर कपातीमुळे स्वस्त घर आणि वाहन खरेदीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



