Bank scams : सुब्रमण्यम स्वामींच्या ‘त्या’ याचिकेला आरबीआयचा विरोध

नवी दिल्ली – बॅंक घोटाळ्यांमधील रिझर्व्ह बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे, त्या याचिकेला भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जोरदार विरोध दर्शवला आहे. अशी याचिका दाखल करण्याचा याचिकाकर्त्याला आधिकार नाही आणि त्यांचा दावा तथ्यात्मक आणि कायदेशीर दृष्टीने गोंधळलेल्या स्वरूपाचा आहे असेही आरबीआय तर्फे कोर्टात सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत मूल्यमापन करण्याची यंत्रणा आरबीआयच्या अंतर्गत कार्यान्वित आहे असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.
याचिकाकर्त्यांनी म्हणजेच डॉ. स्वामी यांनी आरबीआय अधिकाऱ्यांचा घोटाळ्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि हे आरोप चुकीचे आणि अप्रामाणिक आहेत, असेही आरबीआयने कोर्टात नमूद केले आहे.
बॅंक कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्रीय दक्षता आयोगही करीत असतो असेही कोर्टापुढील सुनावणीच्यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.




