Ravindra Dhangekar |Sharad Pawar | Murlidhar Mohol : काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली असून, पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून धंगेकर यांच्या नावाची शहरभर चर्चा होती. अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता पुण्यात धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने त्यांच्या दुसऱ्या यादीत पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली होती. मात्र, काँग्रेसने महाराष्ट्रातील एकही जागा जाहीर केली नव्हती. गुरुवारी (दि. २१) सात जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यातील एक नाव पुण्यातील धंगेकर यांचे आहे. धंगेकर हे सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
गिरीश बापट खासदार झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नगरसेवक पदावरील धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात यश मिळवले होते. त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत आमदारकी मिळविली होती. । Ravindra Dhangekar |Sharad Pawar | Murlidhar Mohol
दरम्यान, नुकतंच रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उमेदवारी मिळाल्याबाबत सदिच्छा भेट आणि मार्गदर्शसाठी ही भेट होती. त्यासोबत शरद पवार यांची मदत येणाऱ्या लोकसभेसाठी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शरद पवारांसोबत भेट झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना डिवचले आहे.
“त्यांच्याकडे जर पैलवान प्रचाराला असतील, तर माझ्यासोबत वस्ताद आहेत. त्यामुळे कोणी प्रचाराला आलं तरी एवढा काही फरक पडणार नाही,” असं म्हणत धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे. यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या सोबत काँग्रेस नेते मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस कार्यकर्ते रोहन सुरवसे पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
भेट झाल्यानंतर धंगेकर यांना प्रश्न करण्यात आला होता की प्रतिस्पर्धी मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारासाठी पैलवान आखाड्यात उतरवले आहेत. त्यावर धंगेकर म्हणाले, “हे क्षेत्रच बजरंगबली आखाडा आहे. पैलवान हे सर्व सामन्य घरण्यातून गरीबी कुटिबंतून आले असतात पण मुरलीधर मोहोळ यांनी कधी पैलवानांना दूध पाजलं का?
त्यांनी पालिका अधिकारी व्यास यांना दूध पाजलं त्यांनी बिल्डरांना दूध पाजलं, त्यांनी कधी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लिटर दुध पाजलं नाही, आणि त्यांच्या कडे पैलवान आले तरी आमच्याकडे वस्ताद आहे. असं शरद पवार यांना उद्देशून म्हणत मुरलीधर मोहोळ यांच्यावर पहिला वार केला. । Ravindra Dhangekar |Sharad Pawar | Murlidhar Mohol