PUNE: रवींद्र धंगेकर हे बहुजन समाजाचे नेतृत्व : सुरतवाला

पुणे : लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी झगडणारा कार्यकर्ता म्हणजे रवींद्र धंगेकर. गेली ३० वर्षे त्यांनी बहुजनांसाठी संघर्ष केला. त्यांच्या हिताचे निर्णय घेतले म्हणून भविष्यात आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे, असे मत माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी आज येथे व्यक्त केले. रवींद्र धंगेकर हे बहुजन समाजाचे नेतृत्व आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या आमदार निधीतून मंडई येथे साकारण्यात येणाऱ्या महात्मा फुले यांच्या मंदिराचे भूमिपूजन सुरतवाला यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, माजी महापौर अंकुश काकडे, उल्हास ढोले पाटील, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, अखिल मंडई मंडळचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय बालगुडे, रुपाली पाटील, विनोद सातव, दीपक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
शांतीलाल सुरतवाला म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र घडवला. महाराष्ट्राला दिशा दिली. महाराष्ट्राचा विकास घडवून आणला. त्यांचे कार्य आजही आपल्याला विकासाचा नवा रस्ता दाखवणारे आहे. त्यांनी जवळपास ५८ वर्षांपूर्वी येथे महात्मा फुले मंदिराचे पुजन केले होते. हे आज फारसे कोणाला माहिती नाही. पण, या घटनेचे स्मरण ठेवून आमदार रवींद्र धंगेकर यांनी या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. हे कौतुकास्पद आहे.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, देशाचे माजी उपपंतप्रधान, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथे १९६५ साली महात्मा फुले मंदिराचे पुजन झाले होते. त्यानंतर आज ५८ वर्षांनी या मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या एका ऐतिहासिक क्षणाचे लोकप्रतिनिधी म्हणून मला भाग्य लाभले, याचा मनापासून आनंद आहे आणि समाधानही आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी वंचित समाजाला शिक्षित करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण असून आजही प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. प्रेरणा देणारे आहे. त्यांचे विचार आपण सर्वांनी आचरणात आणायला हवेत, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.





