Ravi Shastri : विराट-रोहितबद्दल रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘ते संघाच्या रचनेचा भाग पण…’

Ravi Shastri statement on Virat and Rohit : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या 2027 वनडे विश्वचषकातील सहभागाच्या आशा त्यांच्या फॉर्म, फिटनेस आणि जिद्दीवर अवलंबून आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत ही तिन्ही बाबींची महत्त्वपूर्ण कसोटी लागेल. 2017 ते 2021 या काळात भारताचे प्रशिक्षक राहिलेले 63 वर्षीय शास्त्री यांनी सांगितले की, या दोन दिग्गज खेळाडूंना संघातील स्थान निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करावी लागेल.
रवी शास्त्री काय म्हणाले?
रोहित आणि कोहली यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे सुरू होईल. ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’च्या मते, शास्त्री यांनी ‘काया स्पोर्ट्स’च्या ‘समर ऑफ क्रिकेट लॉन्च इव्हेंट’मध्ये सांगितले, “हेच कारण आहे की ते (रोहित आणि कोहली) या मालिकेत खेळत आहेत. ते संघाच्या रचनेचा भाग आहेत. त्यांचा फॉर्म, फिटनेस आणि जिद्द यावरच सर्व काही अवलंबून आहे.”
मूल्यमापनासाठी ही मालिका खूप महत्त्वाची –
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “मला वाटते की, त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मालिकेच्या शेवटी त्यांनाही स्वतःच्या क्षमतेची आणि भावनिक स्थितीची जाणीव होईल, त्यानंतर निर्णय त्यांचा असेल.” रोहित आणि कोहली सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ वनडे क्रिकेट खेळतात. आगामी दोन वर्षांनंतर होणाऱ्या वनडे विश्वचषकात ते भारताच्या दीर्घकालीन योजनांमध्ये बसतात की नाही, हे पाहणे बाकी आहे. त्या वेळी रोहित 40 वर्षांचा, तर कोहली 38 वर्षांचा असेल.
हेही वाचा – IND vs WI : कुलदीप यादवचा जलवा कायम! मोहम्मद सिराजला मागे टाकत पटकावला अव्वल क्रमांक
अलीकडेच रोहितच्या जागी शुबमन गिल याची भारताच्या वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित आणि कोहली यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारताने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. रोहितला अंतिम सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवडले गेले होते, तर कोहलीने संपूर्ण स्पर्धेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावत टॉप पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवले होते.
अनुभवाला पर्याय नसतो –
शास्त्री म्हणाले, “ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, स्टीव्ह स्मिथवरही हेच लागू होते, ज्याने मार्चमध्ये वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या वयात खेळाचा आनंद घ्यावा लागतो आणि जिद्द कायम ठेवावी लागते. पण जेव्हा मोठ्या सामन्यांचा प्रश्न येतो, तेव्हा अनुभवाला पर्याय नसतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण हे पाहिले आहे. मोठे सामने येतात, तेव्हा मोठे खेळाडूच पुढे येतात.”





