Ravi Rana : एकनाथ शिंदेच्या बाबतीत रवी राणा यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीमधील अंतर्गत घडामोडींवर आता अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Ravi Rana : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीमधील अंतर्गत घडामोडींवर आता अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पक्षात येण्याची थेट ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची इच्छा होती की…’
माजी खासदार नवनीत राणा यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत बोलताना रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले “राज्यसभेची जागा खरं तर सुनेत्रा पवार यांची होती. पण ती जागा जर भारतीय जनता पार्टीला मिळाली असती, तर नक्कीच नवनीत राणा राज्यसभेवर गेल्या असत्या.
राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आधीच निश्चित केलं होतं. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची अशी इच्छा होती की नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अर्ज भरावा. त्यांच्या भावना चांगल्या होत्या आणि मी त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.”
पदासाठी उड्या मारणार नाही
नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेचा पुनरुच्चार करताना रवी राणा म्हणाले की, नवनीत राणा यांचे विचार हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाचे विचार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या काम करत आहेत आणि शेवटपर्यंत करत राहतील. केवळ पदासाठी इकडे-तिकडे उड्या मारण्यापेक्षा निष्ठेने आणि स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंची ऑफर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेल्या ऑफरबाबत खुलासा करताना रवी राणा म्हणाले “एकनाथ शिंदे यांनी मला विदर्भाच्या आणि जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करून, ‘शिवसेनेत या आणि काम करा’ अशी अनेकदा ऑफर दिली होती. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, मी देवेंद्र फडणवीस यांचा एक निष्ठावान सैनिक म्हणून काम करत आहे.
जोपर्यंत राजकारणात देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मी त्यांच्यासोबतच पूर्ण ताकदीने उभा राहीन. मी माझी निष्ठा बदलणार नाही आणि कुठेही जाणार नाही.” यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचेही आभार मानले.
रवी राणा (Ravi Rana) यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटप, नेत्यांची ओढाताण आणि अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणांचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.






