मुलीला सैन्यात पाठवण्यासाठी रवी किशन यांचा होता विरोध; म्हणाले….

Ravi Kishan Daughter Ishita | अभिनेता आणि भाजपा खासदार रवी किशन यांची लेक इशिता ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत भारतीय संरक्षण दलात सामील झाली आहे. यानिमित्त तिचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले. यानंतर आता रवी किशन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलीच्या ‘अग्नीवीर’ योजनेत सहभागी होण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना रवी किशन यांना नेते मंडळींची मुलं सैन्यात फार कमी पाहायला मिळतात. तरीही त्यांनी आपल्या मुलीला सैन्यात कसं पाठवलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रवी किशन म्हणाले, “मी सुद्धा माझ्या मुलीला ‘अग्नीवीर’मध्ये पाठवत नव्हतो. कोणत्याही पालकाला असं नाही वाटत की आपल्या पाल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास व्हावा. कारण ते ट्रेनिंग फारच कठीण असतं. ”
पुढे ते म्हणाले, “मी तिला म्हणालो होतो की, तुला हेच का करायचं आहे का? याचा नीट विचार कर. कारण याची ट्रेनिंग खूप कठीण असते. हे सगळं दिसतं तेवढं सोपं नाही. मी जेव्हा तिला विचारलं की तुला सैन्य दलात का जायचंय? त्यावर उत्तर देताना ती मला म्हणाली, तुम्ही पांढरा कुर्ता परिधान करून संसदेत का जाता? तिचं ते उत्तर ऐकून मी शांत झालो.”
21 वर्षीय इशिताने यावर्षी 26 जानेवारी रोजी आयोजित परेडमध्ये सहभाग नोंदवला होता. एनसीसीकडून परेडमध्ये सहभागी झालेल्या 148 महिलांपैकी इशिता एक होती. इशिताशिवाय रवी किशन यांना रिवा, तनिष्क आणि सक्षम अशी आणखी तीन मुलं आहेत.
दरम्यान, भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांनी 700 हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे .ते हिंदी चित्रपट आणि मालिकांचाही भाग आहे. अभिनेता असण्यासोबतच ते एक उत्तम नेता आहेत. यूपीच्या गोरखपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.





