Pune: उत्तर भारतीयांचा तापकीर यांना जाहीर पाठिंबा

धनकवडी – खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या भव्य प्रचार रॅलीने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रचार रॅलीत उत्तर भारतीय समाजाने भीमराव अण्णा तापकीर यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
उत्तमनगर, शिवणे आणि परिसरातील नागरिकांसोबत थेट गाठीभेटी घेत, त्यांच्या समस्या तापकीर यांनी जाणून घेतल्या. रॅलीत उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. या समाजाने भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले.
रॅली दरम्यान महायुती सरकारच्या विकासकामांची माहिती नागरिकांना देत, कमळ चिन्हासोबत असलेला प्रगतीचा आश्वासक संदेश मांडण्यात आला. दरम्यान, धनकवडी बालाजीनगर येथे आयोजित श्री सद्गुरु शंकर महाराज प्रकट दिन पालखी सोहळ्यात खासदार रवी किशन आणि भीमराव अण्णा तापकीर यांनी सहभाग घेत भाविकांशी संवाद साधला.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, भाजप-महायुतीच्या वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीतील जनसमुदायाचा उत्साह पाहून खडकवासला मतदारसंघ पुन्हा महायुतीच्या विजयाची नोंद करणार असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.





