Ravet Firing Case : बिष्णोई टोळीचे शूटर उत्तराखंडमधून जेरबंद! रावेत पोलिसांचा पोलीस आयुक्तांकडून सन्मान
Ravet Firing Case : समाधान हॉटेल परिसरातील गोळीबाराचा अवघ्या काही तासांत छडा; वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या नेतृत्वाला यश.

Ravet Firing Case – भररस्त्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा अवघ्या काही तासांत छडा लावत पोलिसांनी बिष्णोई टोळीशी संबंधित आरोपींना उत्तराखंडमधून जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या तपासाबद्दल रावेत पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त कार्यालयाकडून विशेष सन्मान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी २५ मे च्या रात्री दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून ए. जे. फर्निचर मॉल, कुदळे फार्म, ताथवडे येथून पुनावळे येथील रावेत बीआरटी रोडवरील समाधान हॉटेल परिसरात आले.
आरोपींनी त्यांच्या जवळील पिस्टलमधून तब्बल पाच ते सहा राऊंड फायर करत परिसरात दहशत निर्माण केली आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राहुल खिळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या गंभीर प्रकरणाचा तपास रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला.
भर रस्त्यावर झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या घटनेमुळे रावेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यामध्ये संशयित आरोपी निगडी परिसरात वावरताना दिसून आले.
मात्र, अप्पूघर परिसरानंतर त्यांचा माग काढता आला नाही. त्यामुळे आरोपी ट्रान्सपोर्टनगर परिसरात वास्तव्यास असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तपासादरम्यान शहरातील साईकृपा लॉजमध्ये आरोपींची आधारकार्ड मिळून आली. त्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या वास्तव्याचा मागोवा घेतला. पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.
त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने आरोपींना उत्तराखंडमधून ताब्यात घेत पुण्यात आणले. या विशेष तपास पथकात रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल कुंभार, पोलिस उपनिरीक्षक राहुल खिळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कोळगे, हेड कॉन्स्टेबल आशिष बोटके तसेच पोलिस कॉन्स्टेबल सौदागर लामतुरे आणि प्रदीप गायकवाड यांचा समावेश होता.





