Pune : पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी : एकनाथ खडसेंच्या जावयासह सात ताब्यात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. यात अंमली पदार्थ, दारू, हुक्का आणि गांजा जप्त करण्यात आला असून, एकूण सात जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ड्रग पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर याचा समावेश आहे.
प्रांजल मनीष खेवलकर (४१, इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखील जेठानंद पोपटाणी (३५, डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद (४१, हेरीटेज, एनआयबीएम), सचिन सोनाजी भोंबे (४२, रा. द्वारकानगर, वाघोली) , श्रीपाद मोहन यादव (२७, रा. सुंदर निवास बंगला, आकुर्डी) , ईशा देवज्योत सिंग (२२, रा. औंध), प्राची गोपाल शर्मा (२३, रा. म्हाळुंगे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे ४१ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल सापडला. यामध्ये २.७ मिलिग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा, दहा मोबाइल, हुक्का पॉट, दारू, बिअरच्या बाटल्या, हुक्का फ्लेवर, दहा मोबाइल आणि दोन चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली. ही कारवाई खराडी येथील स्टेबर्ड अझुर सूट या हॉटेलमध्ये रविवारी रात्री साडेतीन वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चभ्रू सोसायटीतील सर्व्हिस अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ड्रग पार्टी सुरू असल्याची खबर मिळाली होती. या फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली ड्रग पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापेमारीदरम्यान प्रमाणात कोकेन, गांजा, दारू आणि हुक्क्याचा साठा जप्त केला. या पार्टीत सहभागी असलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या पतीचा समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, पुण्यातील उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी ड्रग पार्टीच्या ठिकाणानंतर डॉ. प्रांजल खेवलकरच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकला.
तेथेही पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी झाडाझडती घेतली. पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकरला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर खेवलकरला हडपसर येथील त्यांच्या बंगल्यावर आणण्यात आले. बंगल्यातून पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या वेळी पोलिसांनी काही गोष्टी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, या गोष्टी नेमक्या काय होत्या, हे अद्याप कळू शकलेले नाही.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सुदर्शन गायकवाड, शैलेश संखे, स्मिता वासनिक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि पथकाने ही कारवाई केली.
“जप्त केलेले अंमली पदार्थ न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. अंमली पदार्थ कोणी पुरविले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे”.
-निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा





