Ratnagiri News : अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याती खेड येथे भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भरणे जगबुडी पुलावरून नदी पात्रात मोटार कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मिरा रोड येथून मिताली मोरे या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांसह माहेरी जात असताना ही दुर्घटना घडली. मिताली मोरे, मिहार मोरे, परमेश पराडकर, मेघा पराडकर आणि सौरभ पराडकर अशी मृतांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईनजीकच्या मिरा रोड येथील मिताली मोरे या कुटुंबासह देवरुख येथे जात होते. पहाटेच्या सुमारास कार जगबुडी नदीच्या पुलावरुन जात असताना भरधाव वेगात होती. त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरुन नदीपात्रात थेट 100 ते 150 फूट खाली कोसळली. कार खाली कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला होता. क्रेनच्या सहाय्याने कार वर उचलण्यात आली.
यामध्ये कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कार चालक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.





