पिंपरी | उद्योजक, कामगारांकडून रास्ता रोको आंदोलन

पिंपरी, (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरात कचरा समस्या गंभीर बनल्यामुळे उद्योजक व कामगारांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि कामगार वर्ग उपस्थित होते.
यावेळी कचरा रस्त्यावर फेकून कचऱ्याची होळी करण्यात आली आणि पुढील काळामध्ये सातत्याने एकत्र उचलला न गेल्यास उद्योजक कचरा रस्त्यावर टाकतील हा इशारा देण्यात आला.
परिसरामध्ये कचऱ्याची समस्या गंभीर बांधल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कचरा रस्त्यावर टाकला तर कारवाई आणि कंपनी ठेवला तर रोगराई ही अवस्था सध्या एमआयडीसीची झाली आहे.
एमआयडीसी मध्ये उद्योजकांना कंपन्यांना खासगी गाड्यांना पैसे देऊन कचरा देण्याची वेळ आली आहे. कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत राहिल्यामुळे कामगारांना आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना डेंगू मलेरिया, चिकनगुनिया यासारखे रोग झाले आहेत.
परंतु कंपन्यात कचरा साचू देण्यामागे नक्कीच भंगार व्यवसायिकांचा मोठा हात असून कंपन्यांमधील कचरा भंगार व्यवसायिक सुद्धा उचलत आहेत.
या कचऱ्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य हे मिळते आणि कदाचित या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी भ्रष्टाचाराचा मोठा वास येताना दिसतो आणि याचा परिणाम कामावर झाला असून अनेक कामगार हे सातत्याने सुट्ट्या घेतात.
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने छोट्या घंटागाड्या चालू करण्याची मागणी केली आहे. औद्योगिक परिसरात अनेक देशी-विदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी येत असतात.
परंतु परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी घाण वाढली आहे, यामुळे काही ठिकाणी तर कामगार वर्गाला बाहेर बसून जेवताही येत नाही.
गेली कित्येक वर्ष एमआयडीसी मध्ये सातत्याने स्वच्छता असायची परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीमध्ये प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग झालेले आढळून येतात, असे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
यावेळी अनेक उद्योजकांनी आपले विचार व्यक्त केले आणि महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आली,यावेळी अध्यक्ष श्री अभय भोर उद्योजक जसबिंदर सिंग, मिलिंद काळे, प्रवीण चव्हाण, कृष्णा वाळके, सचिन भगत, राहुल गरड, नितीन शिर्के, अमोल स्वामी, इसाक पठाण उद्योजिका दुर्गा भोर, जयश्री साळुंखे आणि अनेक उद्योजक अनेक कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.





