rashmika mandanna: “पुरुषांनीसुद्धा पिरियड्सचा अनुभव घ्यावा…” वक्तव्यावर ट्रोल होताच रश्मिकाचं स्पष्टीकरण; म्हणाली- “मला भीती वाटते कारण…”

rashmika mandanna: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचं एका मुलाखतीतलं वक्तव्य. “पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा अनुभव घ्यावा, तेव्हाच महिलांना दर महिन्याला जो त्रास होतो, तो त्यांना समजेल.”
हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रश्मिकाला प्रचंड ट्रोल केलं गेलं. पुरुषांविषयी असंवेदनशील बोलल्याचा आरोपही करण्यात आला. आता रश्मिकाने स्वतः पुढे येऊन संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
रश्मिका म्हणाली, “मी जे बोलते त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढतात”
एका कार्यक्रमात रश्मिकाला थेट विचारलं गेलं की, “तुम्ही खरंच मानता का की पुरुषांनी पिरियड्स अनुभवावेत?”
यावर ती म्हणाली, “हो, मला खरंच वाटतं की पुरुषांनी एकदातरी पिरियड्सचा त्रास अनुभवला तर त्यांना महिलांच्या वेदना समजतील. हार्मोन्समुळे शरीर आणि मनावर अनेक बदल होतात, जे समजावून सांगणं कठीण असतं. कितीही सांगितलं तरी ते पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे एकदातरी अनुभव आला तर त्यांना खरी जाणीव होईल.”
पण तिच्या या वक्तव्याला सोशल मीडियावरून जोरदार विरोध झाला. त्यावर रश्मिका पुढे म्हणाली,
“आता मला मुलाखत देतानाही भीती वाटते. आपण काही वेगळं बोलतो, आणि त्याचा वेगळाच अर्थ काढतात. त्यामुळे कुठे बोलायला गेले की काय वाद निर्माण होईल याची काळजी वाटते.”
“पिरियड्सच्या वेदनेमुळे मी बेशुद्धदेखील पडले आहे”, रश्मिका
रश्मिकाने तिचा वैयक्तिक अनुभव सांगताना भावनिक होत म्हणाली, “माझ्या पिरियड्सच्या वेदना इतक्या तीव्र असतात की मी एकदा तर बेशुद्धही पडले होते. अनेक डॉक्टर, अनेक चाचण्या… पण नेमकं असं का होतं, हे कोणी समजावून सांगू शकले नाही. प्रत्येक महिन्यात मी देवाला विचारते, ‘माझ्याच वाट्याला इतका त्रास का?’ त्यामुळे मला वाटतं की या वेदना समजण्यासाठी त्या स्वतः अनुभवायला लागतात.”
वादाची सुरुवात कशी झाली?
एका फॅन पेजने रश्मिकाच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत तिचं समर्थन केलं. त्यात म्हटलं होतं की,
“ही तुलना नाही, पुरुषांना कमी दाखवणं नाही. फक्त एवढंच की महिलांच्या भावना आणि वेदना समजून घ्याव्यात.”
पण सोशल मीडियावर हा मुद्दा वादात बदलला आणि रश्मिकाला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.
कामाच्या अपडेट्स
रश्मिका नुकतीच ‘द गर्लफ्रेंड’ या तेलगू चित्रपटात दिसली. तसंच विजय देवरकोंडासोबत तिचं नातं आणि दोघांच फेब्रुवारीमध्ये लग्न होणार असल्याचं म्हटलं जाणं, या दोन्ही कारणांमुळे ती सध्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांतून तिने सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.





