Rashii khanna: अभिनेत्री राशी खन्ना नुकतीच ‘120 बहादुर’ या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर सोबत झळकली. या चित्रपटात तिने साकारलेला राजस्थानी मुलीचा रोल प्रेक्षकांना खूप पसंत पडला आहे. विविध भाषांतील चित्रपट करून झाल्यानंतर राशी आता नवीन आणि वेगळे प्रयोग करण्याच्या शोधात आहे. एका चॅनेलशी संवाद साधताना तिने आपल्या प्रवासाबद्दल, निवडलेल्या भूमिकांबद्दल आणि भविष्यातील स्वप्नांच्या रोल्सबद्दल बोलली. विविध भाषा आणि संस्कृतीतील भूमिका किती कठीण? राशी म्हणाली, “वेगवेगळ्या संस्कृती आणि भाषांमध्ये काम करणे हे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. जरी ते कठीण असले तरी त्यातच एक्टर म्हणून खरी मजा आहे.” पहिल्या दिवशी सेटवर जाताना तिला नेहमी थोडी भीती वाटते. योग्य उच्चार, भावनांची योग्य अभिव्यक्ती आणि त्या भाषेत नैसर्गिक वाटणे ही मोठी जबाबदारी असल्याचे ती सांगते. ‘120 बहादुर’मध्ये तिने राजस्थानी, एका शोमध्ये पंजाबी तर एका प्रोजेक्टमध्ये बंगाली मुलीची भूमिका केली आहे. ती हसत म्हणते, “आज तुम्ही मला विचाराल की मी नक्की कोण आहे, तर मीच सांगू शकणार नाही. इतकी रूपं साकारल्यानंतर मला वाटतं की मी खरी भारतीय आहे!” ‘120 बहादुर’ ऑफर आली, तेव्हा पहिली प्रतिक्रिया? राशी सांगते, “पहिली भावना होती अभिमानाची ! मोठ्या गोष्टीची भागीदार झालेय असं वाटलं.” तिला भूमिकेची लांबी नव्हे, तर ती प्रेक्षकांच्या मनात किती काळ राहील हे महत्त्वाचं वाटतं. दिग्दर्शकाच्या कुटुंबातील अनेक लोक सैन्यात असल्याने त्यांना विषयाची सखोल माहिती होती त्यामुळे काम सोपं झालं. एक्सेल एंटरटेनमेंट आणि फरहान अख्तर यांचं नाव जोडल्यामुळे प्रकल्पावर विश्वास अधिकच वाढला असं राशी म्हणाली. राजस्थानी उच्चार शिकण्यासाठी तिने कोचसोबत खूप मेहनत घेतली. दिग्दर्शकाने सांगितले की राजस्थानी श्रीमंत घरात भावना जरा दडवून व्यक्त केल्या जातात हे लक्षात घेऊन तिने संवाद अनेक वेळा साधला. एक अभिनेत्री म्हणून तुमची सर्वात मोठी ताकद कोणती? राशीच्या मते, “मी डोक्याने नव्हे, तर मनाने निर्णय घेते.” ती स्वतःला भावनिक मानते आणि ही बाबच तिला भूमिका समजून घेण्यास मदत करते. लोकांचे निरीक्षण तर करतेच, पण त्यांना मनाने समजून घेते असे ती म्हणते. “कदाचित हीच माझी खरी ताकद आहे.” स्क्रिप्ट वाचताना तुम्ही पहिल्यांदा काय पाहता? कथा किती खरी आणि मनाला भिडणारी आहे? पात्राच्या नजरेत चमक आहे का? त्याची भावनिकता मला जाणवते का? राशी पुढे म्हणते,”जिथे मला खऱ्या अर्थाने हसू किंवा रडू येतं, तीच माझ्यासाठी योग्य स्क्रिप्ट असते.”