नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा सर्वाेत्कृष्ट लेगस्पिनर रशीद खानने टी-20 क्रिकेटमध्ये एक मोठा इतिहास रचला आहे. त्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने कोणता रेकॉर्ड केला आहे? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया… ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू रशीद खानने टी-20 क्रिकेटमध्ये 633 विकेट घेऊन एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. रशीद खानने वेस्ट इंडिजचा माजी स्टार क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होचा विक्रम मागे टाकला आहे. ड्वेन ब्राव्होने 582 सामन्यात 631 विकेट घेतल्या होत्या. मंगळवारी पार्ल रॉयल्स विरुद्ध SA20 2025 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रशीद खानने 2 विकेट घेत इतिहास लिहिला. रशीद खानने 461 सामन्यात 633 विकेट घेतल्या आहेत. 2015 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रशीद खानने आतापर्यंत 461 सामने खेळून एकूण 632 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विकेट्सचा समावेश आहे. या टी-20 क्रिकेटमध्ये रशीद खानची आतापर्यंतची सरासरी 18 च्या आसपास आहे आणि तो साडेसहा च्या इकॉनॉमीमध्ये विकेट घेतो. खूप दिवसांपासून हा विक्रम ड्वेन ब्राव्होच्या नावावर होता मात्र आता हा विक्रम रशीद खानच्या नावावर झाला आहे. रशीद खान ॲडलेड स्ट्रायकर्स, बँड-ए-आमिर ड्रॅगन्स, बार्बाडोस ट्रायडेंट्स, कोमिला व्हिक्टोरियन्स, डर्बन हीट, गुजरात टायटन्स, गयाना ॲमेझॉन वॉरियर्स, काबुल जवानान, लाहोर कलंदर्स, एमआय केप टाऊन, एमआय न्यूयॉर्क, स्पीन घर टायगर्स, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स, सनरायझर्स हैदराबाद, ससेक्स, ट्रेंट रॉकेट्ससाठी फ्रँचायझी क्रिकेट खेळला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज 1. रशीद खान (अफगाणिस्तान) – 633 विकेट्स 2. ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) – 631 विकेट्स 3. सुनील नरेन (वेस्ट इंडिज) – 574 विकेट्स 4. इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – 531 विकेट्स 5. शकीब अल हसन (बांगलादेश) – 492 विकेट्स