अहमदनगरमध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

नगर – शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, थंडीतापासह डेंग्युची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. महापालिका हद्दीत सध्या डेंग्युचे 25 रुग्ण असून, डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या 302 आहे. ही संख्या शासकीय नोंदीनुसार आहे, प्रत्यक्षात डेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, बहुतांश रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. डेंग्युचा वाढता फैलाव लक्षात घेता महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत अपुऱ्या पडत आहेत.
सप्टेंबर शेवट आठवड्यामध्ये पावस उघडला आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या सर्दी, खोकला, थंडीताप, गोचिड ताप आणि डेंग्युच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांच्या आळ्यांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यातून डेंग्यु आजाराचा फैलाव होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून न राहता घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साठे वेळोवेळी तपासणे, भंगार साहित्यात साठलेले पावसाचे पाणी नष्ट करणे, डास निर्मितीची ठिकाणे नष्ट करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये डेंग्युची परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात साथीच्या आजाराचा कोणताही फैलाव झालेला नसून, मात्र सध्या डेंग्युचा फैलाव कमी झाल्याचे सांगितले आहे. महापालिकेचे सात आरोग्य केंद्र असून, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, पाण्याचे भरलेल्या डबक्यांमध्ये पावडर टाकून त्यातील अळ्या नष्ट करणे, नर्सेस आणि आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन पाणी साठवणीच्या साधनांची तपासणी करणे, नियमितपणे सुरू आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रामार्फत तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले जात आहेत. धूर फवारणीचे काम सुरू आहे. नागरिकांना आव्हान घराच्या आजूबाजूला पिण्याची पाण्याची स्वछता ठेवणे.
अनिल बोरगे, वैद्यकीय अधिकारी





